Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेषा आणि लाकडे यांना आकार देणारे सप्रे यांचे १३ डिसेंबर २०२४ रोजी निधन.

मनोहर सप्रे साहित्यावर प्रकाश टाकणारा लेख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  मनोहर सप्रे यांचा जन्म ४ जानेवारी १९३३ रोजी झाला. काल वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतःच्या निवासस्थानी ते राहत असे. अर्ध्या शतकाहून अधिक काळ सातत्याने कार्यरत राहून मनोहर श्रीधर सप्रे यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून संख्येने आणि गुणात्मकतेने मराठी व्यंगचित्र क्षेत्रात वेगळे नाव कोरलेले आहे. पण त्याहीपेक्षा व्यंगचित्रकलेचा आस्वादक आणि अभ्यासक म्हणून त्यांनी केलेले विपूल लिखाण म्हणजे मराठी व्यंगचित्रकलेला दिलेली अनमोल देणगी आहे.

मनोहर सप्रे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, व्यंगचित्रकार, काष्ठशिल्पी, राजकारणी आणि साहित्यकाराच्या विविध कलागुणांची सरमिसळ असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक व्यंगचित्रकार म्हणून परखडपणा, निर्भिडपणा शिवाय कलेविषयीच्या विविध धाग्यांची गुंफण करून कलात्मक समीक्षा करताना ते संवेदनशील मताचा प्रत्यय देतात. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वात सौंदर्यात्मकतेचा व मानवी सौंदर्याचा फुलोरा आहे. ज्यात ते ‘स्व’ बरोबर इतरांचेही चेहरे दाखवितात. सप्रे कलासक्त, निर्भिड संवेदनक्षम, अस्तित्ववादी होते, हे सतत त्यांच्या साहित्यातून जाणवत राहते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अकोल्यातून तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये खाजगीरित्या एम. ए. करून पुढे दोन वर्ष अमरावतीला प्राध्यापकाची नोकरी केली. त्यानंतर ते जनता महाविद्यालय चंद्रपूर येथे २२ वर्षे तत्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक होते. नोकरीच्या निमित्ताने जीवनात जे अनुभव आले ते त्यांच्या जीवनाला उब देत गेले. जागतिकीकरणाने आजूबाजूच्या जगण्यासंबंधीची मूल्ये बदलत चालली होती. अशा परिस्थितीत आपण विसंगत ठरत आहोत. याची त्यांना जाणीव होत गेली. प्राध्यापक म्हणून शिकविण्यातलाआणि जगण्यातला आनंद हळूहळू ओसरत गेला; आणि एके दिवशी अचानक त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.पुढे पेन्शन नको म्हणून तेही नाकारले. एकंदरीत जीवन जगण्याची मुळात आपली पद्धती चुकीची आहे, असे स्वतच: ठरवून त्यांनी स्व जीवन जगण्याचा नवा मार्ग त्यांनी शोधला. ‘स्व’ स्वातंत्र्य जपणारा मार्ग त्यांनी जीवन जगण्याकरिता निवडला.

बौद्धिक गुलामगिरीचे आणि निर्बुद्धजीवी समाधानाचे जोखड एकदाचे फेकून देऊन कलेची आवड असलेल्या सप्रे सरांनी कलाजीवनाचा नवा शोध घेतला. नोकरीच्या निमित्ताने जीवनानुभवातून त्यांचे स्वत:विषयीचे तुटलेपण, नोकरीची उदासीनता, मानसिक एकाकीपण यातून जीवनाच्या क्षणभंगूरतेच्या जाणीवेने ते अंतर्मुख, एकांतप्रिय आणि जीवनव्यवहाराविषयी अलिप्त बनत गेले. या अलिप्तपणात, एकांतात, जीवन जगण्यासाठीच्या जीवन जाणिवा प्रगल्भ होत गेल्या. या प्रगल्भ जाणिवेतून आणि स्वतःच्या अनुभवातून मानवी जीवनाच्या जगण्यातील विसंगतीचा शोध घेणारा मार्ग शोधला. आणि तो मार्ग त्यांना सापडला. तो म्हणजे सप्रे नामक व्यंगचित्रकाराचा जन्म झाला. व्यंगचित्रकलेमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून यांनी अनेक वर्ष आपले घरही चालविले. एवढेच नव्हे तर चुलीच्या वाटेकडे जाणारे जळावू लाकूड त्यापासून शिल्प बनवून सन्मानाने त्याला दिवाणखाण्यात बसविले. काष्टशिल्पकला सातासमुद्रापार गेली.त्याच्या निवासस्थानी आर्ट गॅलरी आहे.एकूण काष्ठशिल्पकला ही त्यांच्या आयुष्याचे प्रतीक ठरली.
स्वतःमधील व्यंगरुची, कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती आणि चित्र यांच्या एकत्रित संयोगाने त्यांचा सृजनाचा मार्ग मोकळा झाला. यातून पुढे मनोहर सप्रे एक व्यंगचित्रकार, काष्ठशिल्पकार, साहित्यकार म्हणून परिचित झाले. त्यांच्या सांजी आणि रुद्राक्षी या पत्रलेखनातून जीवनाचे द्वंद्वात्मक रुप अनुभवलेल्या सप्रे मधील कलावंत तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जातो. जीवन विषयक मूलगामी प्रश्नांचे चिंतन करू लागतो. आणि जगण्याच्या प्रयोजनाचा विचार करू लागतो. याबाबत एकदा ते म्हणाले होते “व्यंगचित्रकलेने मला पुरेसं उत्पन्न दिलं, यापेक्षाही तिनं मला आर्थिक असुरक्षिततेच्या भयापासून बऱ्याच प्रमाणात मुक्त केलं, हे व्यक्तीस्वातंत्र्याच्या दृष्टीने अधिक मोलाचं ठरते. प्रचलित व्यवस्थेत ‘स्व’ विकला जाणार नाही. म्हणून ते कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाही. कला हे स्वातंत्र्याचे आणि त्यांच्या अस्तित्त्वाचे उत्कृष्ट साधन ठरली. स्वनिर्मित, आत्मनिर्भर जीवन जगण्याचा मार्ग निवडला. स्वतःचे स्वातंत्र्य कुणाच्याही बंधनाखाली जाणार नाही. समाजाच्या अनिष्ट रूढी परंपरा ,रीतीरिवाज यांना वाकणार नाही.हे सिद्ध करण्यात त्यांचे जीवन सार्थकी झाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रचंड वाचन असलेल्या सप्रे सरांनी इसाडोरा डंकन च्या माय लाईफ या आत्मचरित्रासारख्या अनेक ग्रंथ अभ्यासातून जीवनाचा शोध घ्यायला सुरवात केली. त्यांचे स्वतःचे स्वतंत्र ग्रंथालय आहे.आंतरिक संवादातून सांजी,(१९९२),फरसाण, (१९९५ ) रुद्राक्षी, ,(२००८ )दहिवर, ,(२०१०)व्यंगविनोद, ,(२०११) बिल्लोरी, ,(२०११) अलस- कलस, ,(२०११) व्यंगार्थी (२०१२ )हसा की ! ,(२०००) अशी ग्रंथ निर्मिती झाली. त्यांच्या साहित्यातून वाचकाला चित्रकला, शिल्पकला, काव्य, साहित्यसमीक्षा या सर्व विषयावरील त्यांचे सूत्रमय विचार आणि चित्रकार, शिल्पकार, कवी, साहित्यिक, समीक्षकाच्या रूपाने पत्रातून भाष्यस्वरूपात भेटतात. चित्रकलेविषयीची प्रगल्भ जाण श्री अडिवरेकर, बी. विठ्ठल आणि प्रभा या प्रसिद्ध चित्रकारांना लिहिलेल्या पत्रांमधून दिसते. त्यातून कोणतीही कला ही कलाकाराच्या आत्मशोधाचे प्रतिबिंब असल्याचे जाणवते. कवी आणि रसिक यांच्यात असलेली सीमारेषा दाखवून देणारा जाणकार समीक्षक त्यांच्या पत्रातील सर्व कवितांमधून दिसून येतो. मनोहर सप्रे केवळ ‘कलावंत’ म्हणून न राहता त्यांचा साहित्यसमीक्षा विचारही महत्त्वाचा आहे. एखादी साहित्यकृती कशी असावी व तिच्याकडे बघण्याची दृष्टी आजच्या समीक्षकांना प्रेरक ठरते.

अभिव्यक्तीच्या आंतरिक निकडीतून, मनाला भावण्याच्या मानसिकतेतून त्यांनी पत्रलेखन हा वाङ्मयप्रकार निवडला. परंतु त्यांची अनेक पत्रे ही निमित्तमात्र मायण्यातील स्वगत आहेत. मानवी जीवन जगण्याच्या पैलूंचा घेतलेला अनाकलनीय असा शोध आहे.मानवी मूल्यासोबतच स्व जाणिवांचा आकारलेला आलेख आहे.याचे कारण म्हणजे पत्रलेखक म्हणून सप्रे सरांनी पत्रातभाराभर गोष्टींचा समावेश न करता, कलात्मक मांडणीतून सुचकता उठावदार केली आहे.उदा.मन जगायला तयार नाही.शरीर मरायला नाही…हत्तीला थांबवन्याचं बळ असते, पण मुंगीला चालत करण्याची कळ नसते…अशी कितीतरी जीवनाचे तत्वज्ञान मांडणारी सुचकतेची उदाहरण…त्याच्या पत्रलेखनातून प्रकटतात. पत्रात एक मनुष्य निरनिराळ्या माणसाशी वेगवेगळ्या तऱ्हांनी कसा वागतो, हे दिसते. त्यावेळी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या बाजू प्रत्येक वेळी दिसतात.अशा विविध स्वभावाच्या माणसाचे चित्र वाचकांसमोर उभे राहते.

चित्रकारांची चित्रे, जी.ए ची कथा, माधव आचवलांची समीक्षा, तेंडुलकरांचे आत्मचरित्र,ग्रेस, यांच्या कलाकृतीचा आस्वाद घेता घेता अंतरंगात डोकावून पाहण्याची त्यांची अभ्यासवृत्ती लक्षणीय आहे. प्रत्येक कलाकृतीत काही संगती शोधण्याची सुंदर प्रवृत्ती वाचकाला अनुभवता येते. एकदा पत्र वाचायला सुरुवात केली की, प्रत्येक पानावर एका अनोख्या व्यक्तीची ओळख होते.आणि वाचकाला आपले आयुष्य सापडू लागते.तर नेमके जगायचे कसे याचे अचूक भानही येते. विशेष म्हणजे त्यांच्या पत्रलेखनात माणसाच्या जगण्याला आतबाहेरले म्हणून जितके पैलू आहेत.त्या प्रत्येक पैलूंच्या व्याख्या त्यावर भाष्य आणि त्या प्रत्येक पैलूंला उत्तर आहे.

वाचक म्हणून एखाद्या साहित्यकृतीतून मर्म शोधण्याची त्यांची वृत्ती सर्जनशील आहे. त्यांच्या पत्रवाड्‌मयाच्या संरचनेत त्यांच्या रसिक मनाची आणि वाङ्‌मयाच्या चिंतनाची साक्ष आहे. जीवनाची गुंतागुंत, कला आणि जीवनाचे नाते, स्वप्न आणि वास्तव, समाज आणि राजकारण यांचा विविध पद्धतीने विचारही दिला आहे. मनोहर सप्रे व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी व्यंगचित्रकलेची केलेली मांडणी जीवनवादी आहे. मानवी सुखदुःख, राग, लोभ यातून संपूर्ण जीवन साकारत जीवनतत्त्वाप्रत ते पोहचले. हे तत्त्व व्यंगचित्रकलेच्या विविध रेषेमधून मांडून समाजाला जागृत केले. जाहिरातबाजीच्या चक्रात मानवी मूल्यांची पडझड केलेला चंगळवाद सप्रे यांच्या लेखनीतून, विशेषतः व्यंगचित्रातून द्रवीभूत झाला आहे.
माणसामाणसातील जीवन जगण्याची विसंगती टिपून ती रंगतदारपणे शब्दांकित करण्याची भाषाशैली. केवळ औपचारिकता म्हणून लेखन केलेले नसून त्यांनी वेगवेगळ्या विषयावर मुक्त संवाद साधून वाचकाला अंतर्मुख केले.सप्रे यांच्या भाषाशैलीचा आणखी एक विशेष म्हणजे ते व्यंगचित्रकार असल्याने व्यंगचित्रकलेतील विविध शब्द जसे रेषा, बिंदू, वर्तुळ, आरंभ, पूर्णविराम, खूण, रंग इत्यादी शब्दातून जीवनाभिमूख तत्त्वज्ञान मांडले आहे. केवळ पारंपरिक साहित्याच्या कोणत्याही चौकटीत बंदिस्त न राहता जे जे आत्मसात करता येईल,त्या त्या प्रकारे त्यांनी लेखन केले.पत्रात्मक लेखन,विनोदी लेखन आणि व्यंगचित्रकला प्रकार हाताळून मराठी साहित्यात त्यांनी आपले मानाचे पान निर्माण केले.
अशा प्रतिभासंपन्न,मर्मग्राही, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या आदरणीय मनोहर सप्रे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

Comments are closed.