Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बदल हेच सत्य मानून वाटचाल केल्यास यश नक्की – डॉ. दिनकर खरात

महामानवांचे विचार यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणारे - चंद्रकांत दळवी यांचे प्रतिपादन, 'सावित्रीज्योती' व 'रमाई-भीमराव' राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुणे, दि. १५ एप्रिल : “बदल हेच सत्य, असा सिद्धांत गौतम बुद्धांनी दिला. याच सिंद्धांतावर माझे आजवरचे आयुष्य आहे. आयुष्यातील प्रत्येक वळणाला बदल म्हणून स्वीकारले आणि नवे शिकत, आत्मसात करत गेलो. म्हणूनच वाटते की, बदल हेच सत्य मानून वाटचाल केल्यास यश नक्की मिळते,” असे मत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. दिनकर खरात यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सावित्रीज्योती’ व ‘रमाई-भीमराव’ राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. खरात बोलत होते. ‘सावित्रीज्योती’ राष्ट्रीय पुरस्कार सूर्यदत्त शिक्षण संस्थेचे सुषमा व प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना, तर ‘रमाई-भीमराव’ राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिका डॉ. माधवी आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. दिनकर खरात यांना प्रदान करण्यात आला. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त शुक्रवारी एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे होते. प्रसंगी बाविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत वानखेडे, निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, प्रा. अनंत सोनवणे, प्रा. प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते. ‘कालाभुला’ या डॉ. नयनचंद्र सरस्वते लिखित पुस्तकाचे प्रकाशन झाले.

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ आणि ‘त्यागमूर्ती रमाई आंबेडकर’ पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. यात ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ संगीता झिंजुर्के (पुणे), प्रीती जगझाप (चंद्रपूर), नलिनी पाचरणे (पुणे), मीनाक्षी गोरंटीवार (यवतमाळ), विद्या जाधव (अहमदनगर), उमा लूकडे (बीड), माधुरी वानखेडे (अमरावती) यांना, तर ‘त्यागमुर्ती रमाई आंबेडकर पुरस्कार’ निर्मला आथरे (पुणे), मधुराणी बनसोड (वाशीम), दुशीला मेश्राम (नागपूर), मदिना शिकलगार (पलूस), अक्काताई पवार (कडेगाव), सुरेखा गायकवाड (ठाणे), उर्मिला रंधवे (आळंदी) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डॉ. दिनकर खरात म्हणाले, “बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होत शिक्षण पूर्ण केले. ‘डीआरडीओ’मध्ये जवळपास ३६ वर्ष नोकरी केली. बाबासाहेबांचा आदर्श घेऊन देशाच्या संरक्षण क्षेत्रात थोडेसे काम करू शकलो, याचे समाधान आहे. या काळात डॉ. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर अशा महान संशोधकांचे सान्निध्य लाभले. समाजाला धार्मिक, सामाजिक न्याय मिळण्यासाठी बंधुतेची आवश्यकता आहे. बंधुतेचा विचार सर्वत्र रुजवला पाहिजे.”

चंद्रकांत दळवी म्हणाले, “बाबासाहेब, फुले यांचे काम एवढे अफाट आहे की, सर्वच क्षेत्रात काम करत होते. प्रत्येक क्षेत्रातील प्रचंड जाण आणि त्यातील काम यामुळेच ते महामानव आहेत. म्हणूनच त्यांचे काम पुढे घेऊन जाणे हे आपले कर्तव्य आहे, याच भावनेतून आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करत असल्यानेच कदाचित लोकांना अधिक भावलो. महामानवांचे विचार कृतीत आणले तरच त्यांचा खरा सन्मान होईल आणि समाजाची प्रगती होऊ शकेल. म्हणूनच त्यांचे काम पुढे घेऊन जाणे हे आपले कर्तव्य आहे.”

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “भारत एक असा देश आहे. जेथे सर्व प्रकारच्या संस्कृती एकत्र नांदतात आणि जपल्या जातात. याच भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले जन्माला आले. त्यांचे विचार घेऊन अनेकजण कार्य करत आहेत. त्यांनी लावलेली ज्योत तेवत ठेवण्याचा हा प्रयत्न असतो, असा हा आगळा वेगळा देश आहे. या महापुरुषांचे अंश आणि वंश आपण आहोत, त्यांच्या विचारांचे मौलिक शिक्षण आपण पुढे नेत पुढच्या पिढीला देणे आवश्यक आहे. हे कायम सुरू राहतो हवे, बंद पडू नये.”

प्रकाश रोकडे म्हणाले, “आपण बाबासाहेब, फुले यांना बघू शकलो नाही. मात्र आज जे समाजात मोठे काम करत आहेत, जे लोक या महामानवांचा विचार घेऊन काम करत आहेत त्यांच्यात आपल्याला ते भेटतात. म्हणूनच मनसे जोडणे, शोधणे हा माझा छंद आहे.”

सुषमा चोरडिया म्हणाल्या, “एवढ्या मोठ्या पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढल्याची जाणीव झाली आहे. मुळशी तालुक्यातील लहान, दुर्गम गावांमध्ये सहसा कोणी पोहचत नाही तेथे जाऊन शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्यामुळे सावित्रिज्योती नावाने मिळालेल्या या पुरस्काराने भरून पावले.”

डॉ. माधवी खरात म्हणाल्या, “रमाबाईंच्या खूप अभ्यास केला. त्यांच्यावर कादंबरीही लिहिली. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे. बाबासाहेब कोणत्याही एका जातीधर्माचे नसून सगळ्यांचे आहेत. जातीधर्माच्या पलीकडे आपण जेंव्हा जातो तेंव्हाच समाजाचे नितळ स्वरूप दिसते.”

सरचिटणीस शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. स्वागत-प्रास्ताविक डॉ. विजय ताम्हाणे यांनी केले. प्रा. डॉ. अरुण आंधळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अनंत सोनवणे व प्रा. प्रशांत रोकडे यांनी पुढाकार घेतला.

हे देखील वाचा : 

वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

वाघाच्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी; वाघ बघायला जाणे बेतले जीवावर

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यास अर्थमंत्रालयाचा नकार?

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.