Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यपालांच्या हस्ते टीव्ही पत्रकारांच्या न्यूजरूम लाइव्ह दिवाळी अंकांचे प्रकाशन संपन्न

Get real time updates directly on you device, subscribe now.

कोरोना काळात धैर्याने काम केल्याबद्दल राज्यपालांची पत्रकारांना शाबासकी .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क ०६ डिसेंबर :– कोरोनाचे आव्हान देशापुढे उभे असताना व संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये असताना पत्रकारांनी विशेषतः टीव्ही पत्रकारांनी प्रतिकुल परिस्थितीत धैर्याने बातम्या देण्याचे काम अव्याहतपणे केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकारांना जाहीर शाबासकी दिली. सर्वच माध्यम क्षेत्रात आज तीव्र स्पर्धा असून सबळ असेल तोच टिकेल अशी परिस्थिती आहे. तरी देखील पत्रकार आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजातील उपेक्षित लोकांच्या समस्या मांडत असल्याबद्दल राज्यपालांनी यावेळी गौरवोद्गार काढले. राज्यातील टीव्ही पत्रकारांच्या ‘न्यूजरूम लाइव्ह’ या मराठी दिवाळी अंकांचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते रविवारी (दि. ६) राजभवन येथे संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. आपण देखील राजकारणात येण्यापूर्वी एक उत्साही पत्रकार होते याचे स्मरण देऊन अनुभवातून उथळपणा कमी होतो व प्रगल्भता येते असे राज्यपालांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टीव्ही पत्रकार हा अनेकदा पुरस्कारापेक्षा तिरस्काराचा धनी असतो असे सांगून दिड मिनिटाच्या बाईट पलिकडे त्याचे स्वतःचे चिंतन व भूमिका असते. दिवाळी अंकातून टीव्ही पत्रकारांनी ही भूमिका मांडतांना आत्मचिंतन देखील केले आहे, असे संपादक कमलेश सुतार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार प्रसन्न जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विनोद जगदाळे, दिनेश दुखंडे, सोहित मिश्र, विवेक कुलकर्णी, सचिन चौधरी, मेधा, मयुरेश गणपत्ये, विनायक दावरुंग व कमलेश सुतार या पत्रकारांचा करोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

न्यूजरूम लाइव्ह या दिवाळी अंकाचे संपादन कमलेश सुतार यांचेसह पंकज दळवी व प्रशांत डिंगणकर यांनी केले असून अंकात प्रसन्न जोशी, संजय आवटे, विजय चोरमारे, स्वाती लोखंडे, सुभाष शिर्के यांसह अनेक पत्रकारांचे लेख समाविष्ट केले आहेत. कार्यक्रमाचे संचलन प्रशांत डिंगणकर यांनी केले, तर पंकज दळवी यांनी आभार प्रदर्शन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.