Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे मुंबई विद्यापीठात कोनशिला अनावरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

जगाला दिशा देणारा महामानव आपल्या राज्यात झाला याचा अभिमान मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क  दि. ६ : मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे कोनशिला अनावरण मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एका ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आज संपन्न झाले. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य याला चालना देणारे हे संशोधन केंद्र जागतिक पातळीवर अभिमान वाटेल अशा पद्धतीने उभे करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिली. बाबासाहेबांनी सामाजिक, वैचारिक क्रांती केली. संविधान लिहीले. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे यासाठी लढा दिला. एकीकडे परकीयांशीही लढा दिला. दुसरीकडे समतेसाठी स्वकीयांशी लढा होता. पण यातही त्यांनी आपला ज्ञानप्राप्तीचा व्यासंग जतन केला. जगाला दिशा देणारा महामानव आपल्या देशात, आपल्या राज्यात झाला ही खरोखर अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी काढले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमात खासदार श्री. शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर, माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. मृदुल निळे आदी मान्यवर सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, बाबासाहेबांना वाचनाचा आणि ज्ञानार्जनाचा प्रचंड व्यासंग होता. पण यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. ज्ञानार्जनासाठी त्यांच्या वाट्याला आलेल्या अडचणी, कष्ट यापुढे कोणत्याही व्यक्तिच्या, गोरगरीबांच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी शासन कार्य करेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रातूनही यासाठी निश्चितच दिशादर्शन होईल. हे संशोधन केंद्र लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीशी संलग्न असेल, तसेच ते कोलंबिया विद्यापीठाशी सुद्धा संलग्न झाले पाहीजे. बाबासाहेबांनी आपले ज्ञान स्वत:पुरते मर्यादीत न ठेवता देशाला त्याचा उपयोग करुन दिला. देशाला संविधान दिले. बाबासाहेबांचे कार्य आणि त्यांचे विचार यापुढील काळातही सर्वांना दिशादर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले की, संविधान निर्मितीमधील बाबासाहेबांचे कार्य सर्वांना माहिती आहे. पण बाबासाहेबांनी याबरोबरच देशाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीतही महत्वपूर्ण योगदान दिले आहे. धरणांची उभारणी, पाण्याचा योग्य पद्धतीने वापर, विद्युत निर्मिती, कामगारांचे अधिकार अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांनी फार महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांची वैज्ञानिकदृष्टी देशाला आणि समाजाला महत्वपूर्ण दिशा देणारी ठरली. ज्या विद्यापीठात बाबासाहेबांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात आज त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभे रहात आहे. त्यांचे कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असे ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सुरु करण्याचे मुंबई विद्यापीठाचे हे एक चांगले पाऊल आहे. उपाशी राहून, गरीबीशी सामना करत ज्यांनी अभ्यास केला त्या बाबासाहेबांनी पुढे देशाच्या निर्मितीत महत्वाचे योगदान दिले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे ते नेहमी म्हणत. बाबासाहेब हे फक्त दलितांच्या लढ्याचे नेते नव्हते तर देशातील परिवर्तनवादी चळवळीचे ते प्रणेते होते, असे ते म्हणाले.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत म्हणाले की, विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सुरु व्हावे अशी मागणी २०१२ पासून विविध स्तरावरुन होत होती. आता ही मागणी प्रत्यक्षात साकारत आहे. बाबासाहेबांचे कार्य, त्यांचे विचार याची माहिती विविध भाषांमधून मिळेल. या केंद्राच्या माध्यमातून त्यांचे कार्य आणि विचारांवर संशोधन होऊन ते जगभरात पोहोचेल. यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर, आनंदराज आंबेडकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राविषयी

मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठात ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र’ शैक्षणिक वर्ष (२०२०-२०२१) पासून सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचा कोनशिला अनावरण समारंभ त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आज मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत संपन्न झाला.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या संशोधन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही मूल्याधिष्ठित सामाजिक पुनर्रचनेची जीवनदृष्टी केंद्रस्थानी ठेवून सामाजिक न्याय आणि मानव्यविद्या या अभ्यास क्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरतील अशी ‘ध्येयधोरणे आणि विकासाची दिशा’ या संदर्भातील संशोधनावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्रांशी जोडून घेत विविध पदव्युत्तर व प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथे राबविले जाणार आहेत. ज्यामध्ये आंबेडकर स्टडीज, बुद्धीष्ट थॉट्स, डेव्हलपमेंट स्टडीज आणि सोशल पॉलिसी या विषयात पदव्यूत्तर पदवी करता येणार आहे. याचबरोबर आंबेडकरी विचार आणि तत्वज्ञान या विषयाचा देखील अभ्यास ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्कॉलर्सना संशोधनासाठी उपलब्ध करून देण्याची सोय आहे. तसेच ‘सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या’ आदी विषयांतही आंतरशाखीय संशोधनाची संधी उपलब्ध करून देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम दर्जाचे संशोधन केंद्र म्हणून हे केंद्र उभे करण्याचा मुंबई विद्यापीठाचा मानस आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान तसेच सामाजिक न्यायविषयक दृष्टिकोन यांच्या अभ्यासाची जगभरात विविध संशोधन केंद्रे आहेत. त्याच धर्तीवर भारतामध्ये मुंबई विद्यापीठाने आपल्या ऐतिहासिक परंपरेला साजेसे असे उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी मुंबई विद्यापीठाने हिरीरीने पुढाकार घेतला असून या संशोधन केंद्राची स्वतंत्र इमारत असावी यादृष्टीने विद्यापीठ नियोजन करीत आहे. याचाच एक भाग म्हणून आज या केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.