Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रोहा नगरपरिषद निवडणूक : ‘डराव डराव’ची राजकीय सर्कस सुरूच!नेते आणि प्रशासन पुन्हा मैदानात; मतदार विचारात!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

रोहा :पाच वर्षांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा रोह्यात निवडणुकीचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि त्याबरोबरच अनेक नेते, कार्यकर्ते आणि प्रशासनातील मंडळींनी आपापल्या गोटातून बाहेर डोकावायला सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘चार महिन्यांत निवडणुका घ्या’ असा स्पष्ट आदेश दिला आणि रोहा नगरपरिषदेच्या परिसरात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला.

गेल्या काही वर्षांपासून ज्या रस्त्यांची दुरवस्था झाली होती, जे गटारे तुंबले होते आणि ज्या भागांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य होते, तेथे आता अचानक कामांचे गाजर दाखवले जात आहे. रस्त्यांवर जेसीबी, गटारींमध्ये सफाई कर्मचारी आणि गल्लीबोळात राजकीय सेल्फीचे सत्र सुरू झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पाच वर्षं कुठे होता हा उत्साह?”

स्थानिक रहिवासी संतोष राऊत म्हणाले, “गेल्या काही वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीने आमचा रस्ता ओलांडला नाही. आता मात्र गटारीजवळ फोटोसेशन आणि सोशल मीडियावर ‘लोकसेवा’ची पोस्ट पाहायला मिळतेय. हे सगळं केवळ इलेक्शनपुरतं वाटतं.”

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तरुणांचे राजकारणात उड्डाण

नवोदित उमेदवार, तरुण कार्यकर्ते सध्या सोशल मीडियावर ‘नवा रोहा’ घडवण्याची स्वप्नं दाखवतायत. त्यांच्या पोस्ट, व्हिडीओ आणि ‘लाइव्ह’ सत्रांमध्ये रोहा हेच केंद्रबिंदू आहे. मात्र नागरिक विचारतात, “फेसबुकवरचा स्वर्ग जमिनीवर कधी उतरणार?”

प्रशासनाच्या सफाई मोहिमेला वेळेचं भान

प्रशासनाकडून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमाही सध्या चर्चेचा विषय आहेत. अनेक भागांमध्ये अचानक गटारे स्वच्छ झाली, रस्त्यांना डांबरी आवरण मिळाले आणि फुंकलेल्या दिव्यांची जागा LEDने घेतली. हे सर्व ‘निवडणुकीचा चमत्कार’ मानत नागरिक मिश्कीलपणे म्हणतात, “हे काम कायम चालू राहतं तर रोहा खरंच बदललं असतं.”

मतदारांनी घ्यायचा आहे ‘शहाणा’ निर्णय

या साऱ्या गदारोळात मतदार मात्र शांतपणे सगळं निरीक्षण करत आहेत. ‘पाच वर्षे गप्प आणि निवडणुकीच्या तोंडावर हजर’, अशा प्रवृत्तीला मतदारांनी आता शहाणपणाने उत्तर द्यावं, असं आवाहन ज्येष्ठ नागरिक मंगेश जोशी यांनी केलं. ते म्हणाले, “सतत गटारात लपणाऱ्या बेडूकाला पुन्हा निवडून दिलं, तर पुढचं पावसाळ्यात पुन्हा त्याच डराव डरावचा सामना करावा लागेल.”

Comments are closed.