अहेरीत राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; लॉयड्स संघ उपविजेता
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुक्यात २२ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेने केवळ क्रीडा कौशल्य नव्हे, तर ग्रामीण-आदिवासी भागातील क्रीडा क्षमतेचीही ठळक जाणीव करून दिली. या स्पर्धेत लॉयड्स व्हॉलीबॉल संघाने प्रचंड दबावाखाली सातत्य, शिस्त आणि सांघिक एकजुटीचा उत्कृष्ट नमुना सादर करत उपविजेतेपद पटकावले आणि संपूर्ण स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागांतील १६ बलाढ्य संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक सामना तांत्रिक कसोटीचा ठरला. उपांत्य आणि अंतिम फेरीकडे वाटचाल करताना लॉयड्स संघाने अनुभवी व आक्रमक संघांना नमवत आपल्या खेळातील परिपक्वता दाखवली. अंतिम सामन्यात नागपूरच्या ऑरेंज सिटी संघाने निर्णायक क्षणी अचूक खेळ करत विजेतेपद पटकावले; मात्र अखेरपर्यंत दिलेली झुंज लॉयड्स संघाच्या खेळाडूंना उपविजेतेपदाचा मान मिळवून देणारी ठरली. या यशाबद्दल संघाला ५५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
चंद्रपूर, डब्ल्यूएसएफ वरोरा, चंद्रपूर सिटी, गोंडपिपरी, आम्रपाली, अल्लापल्ली यांसह राज्यातील नामांकित संघांचा सहभाग असल्यामुळे स्पर्धेची तीव्रता अधिक वाढली. त्यामुळे अहेरीसारख्या तालुक्याने राज्यस्तरीय क्रीडा केंद्र म्हणून स्वतःची क्षमता अधोरेखित केली.
स्पर्धेदरम्यान शाहीन भाभीजी हकीम, महिला राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या, तसेच भाग्यश्री अत्राम, जिल्हा परिषद अध्यक्षा, गडचिरोली यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंमध्ये दडलेली गुणवत्ता राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली.
लॉयड्स संघाच्या या यशामागे लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचे सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन प्रशिक्षण धोरण महत्त्वाचे ठरत आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या अकादमीमुळे स्थानिक युवकांना आधुनिक प्रशिक्षण, स्पर्धात्मक अनुभव आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळत आहे. गेल्या काही वर्षांत अकादमी समर्थित संघांनी जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सातत्याने मिळवलेले यश हीच या प्रयत्नांची पावती मानली जात आहे.
भाग्यश्री ताई अत्राम फॅन्स क्लब, अहेरी यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेचा समारोप क्रीडा उत्कृष्टता, सामाजिक सहभाग आणि सकारात्मक ऊर्जेच्या वातावरणात झाला. अहेरीच्या मैदानावर घडलेली ही स्पर्धा केवळ विजेते-उपविजेत्यांपुरती मर्यादित न राहता, परिसरातील क्रीडा चळवळीला नवी दिशा देणारी ठरली.

