भामरागडमध्ये एकल महिलांच्या सक्षमीकरणाचा ठोस संकल्प
उमेदच्या मेळाव्यात योजनांचा थेट लाभ, व्यवसायासाठी अर्थसहाय्य वितरण...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भामरागड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व पंचायत समिती भामरागड तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भामरागड येथे एकल महिला सक्षमीकरण व समावेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. वन विभागाच्या सभागृहात बुधवारी (दि. २८ जानेवारी) पार पडलेल्या या मेळाव्यात भामरागड तालुक्यातील अती दुर्गम भागातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी गोंगले होते. विशेष अतिथी म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी देसाई, एकात्मिक बाल विकास अधिकारी करपते, पंचायत विस्तार अधिकारी माकडे, भामरागड पोलीस ठाण्याच्या अधिकारी धनश्री, तालुका कृषी अधिकारी राऊत, जीडीसीसी शाखा व्यवस्थापक आलाम, तालुका अभियान व्यवस्थापक गंगाधर डोर्लीकर, तालुका व्यवस्थापक दिपक सहारे, आदर्श महिला प्रभाग संघ आरेवाडा–नेलगुंडा यांच्या अध्यक्ष मोनिका वैरागडे, प्रभाग समन्वयक साईनाथ रामगिरवार, पेसा व्यवस्थापक श्रीकांत नैताम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच उमेद अभियानातील ग्रामसखी व व्यवस्थापक उपस्थित होते.
भामरागडसारख्या दुर्गम तालुक्यातील एकल महिलांना केवळ शेतीवर अवलंबून न राहता गौण वनउपज, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यांसारख्या संलग्न व्यवसायांद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प या मेळाव्याच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला. शासनाच्या कोणत्याही योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही, याची दक्षता घेत सर्व योजनांचा लाभ थेट मिळवून देण्याचा निर्धार असल्याचे मार्गदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी देसाई यांनी केले.
मेळाव्यात महिलांसाठी आधारकार्ड अद्ययावत करणे, बँक व विमा सुविधा, आयुष्मान कार्ड, भारत गोल्डन कार्ड, निराधार योजना, बालसंगोपन योजना, लेक लाडकी योजना, आरोग्य विषयक सिकलसेल तपासणी, रक्त तपासणी व औषधोपचार अशा विविध सेवा एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. अनेक योजनांचे प्रारंभिक मंजुरी आदेश यावेळी महिलांना प्रत्यक्ष प्रदान करण्यात आले.
या वेळी आदिशा प्रकल्पांतर्गत दोन एकल महिलांना व्यवसायासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य तर सीएलएफ प्रॉडक्ट कर्जांतर्गत पाच महिलांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपयांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
मेळाव्याचे औचित्य साधून पंचायत समिती भामरागडच्या आवारात जागृती स्वयं-सहायता समूह, कियर यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘जागृती हॉटेल’ या नव्या व्यवसायाचे उद्घाटन गट विकास अधिकारी गोंगले यांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.


Comments are closed.