महावितरणच्या हलगर्जीपणाने जंगल पेटले; स्पार्कमधून आग, प्रशासनाची संवेदनशून्यता उघडी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आलापल्ली परिसरात महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारामुळे मौल्यवान जंगलाला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३३ केव्ही फिडरमधून निर्माण झालेल्या स्पार्कमुळे ही आग भडकली असल्याची प्राथमिक माहिती असून, या घटनेमुळे नैसर्गिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात ही घटना घडली त्या परिसरात आवश्यक सुरक्षा उपाययोजना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आल्या होत्या. नियमांनुसार विद्युत वाहिन्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आणि झाडांची नियमित छाटणी करणे बंधनकारक असताना, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, एका स्पार्कने संपूर्ण जंगलाला आग लागण्याइतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली.
तांत्रिक जाणकारांच्या मते, संवेदनशील वनक्षेत्रात स्वतंत्र फिडरची व्यवस्था करणे आणि उच्चदाब वीजवाहिन्यांद्वारे नियोजनबद्ध पुरवठा करणे आवश्यक असते. मात्र, नियमानुसार पायाभूत सुविधा न उभारता थेट ३३ केव्ही लाईनवर अवलंबून राहिल्याने ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकारामुळे महावितरणच्या कामकाजातील बेजबाबदारपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. विशेष म्हणजे, जंगल जळत असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून अपेक्षित तत्परता आणि संवेदनशीलता दिसून आली नाही. उलट, कार्यकारी अभियंत्याकडून जेवणाचे आमंत्रण देण्यात आल्याची चर्चा रंगत असून, या वर्तनामुळे संताप अधिकच वाढला आहे.
या घटनेमुळे पर्यावरणाच्या सुरक्षेसोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेवरही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

