Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्ली वन विभागात भ्रष्टाचार-दडपशाहीचा स्फोट; सामाजिक कार्यकर्त्यांचे १५० दिवसांच्या उपोषणानंतरही कारवाई शून्य, अखेर वनकर्मचाऱ्यांचा बेमुदत आंदोलन

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी (गडचिरोली) : वनसंवर्धनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतच सत्तेचा कथित दुरुपयोग, दडपशाही आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचली असून, आलापल्ली वनपरिक्षेत्रात कर्मचाऱ्यांनी थेट बंड पुकारत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्या कार्यपद्धतीविरोधात उभा राहिलेला हा संघर्ष आता केवळ स्थानिक मर्यादेत न राहता संपूर्ण वन प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.

कर्मचाऱ्यांच्या निवेदनात मांडण्यात आलेले आरोप केवळ तक्रारी नसून, व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या अपयशाचे निदर्शक ठरत आहेत. कार्यालयीन वातावरणात सन्मानाचा अभाव, दबावाखाली कामे करून घेणे, मंजूर कामे अत्यल्प निधीत पूर्ण करण्याची सक्ती, तसेच ठेकेदारांशी संगनमताचे आरोप—या सर्व बाबींमुळे विभागातील कारभारावर गंभीर शंका उपस्थित होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रकरणातील सर्वात गंभीर आणि धक्कादायक बाब म्हणजे, एका सामाजिक कार्यकर्त्याने या विरोधात तब्बल १५० दिवस उपोषण केले होते. तरीही संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. परिणामी, प्रकरण मंत्रालयापर्यंत पोहोचूनही निष्क्रियतेचेच चित्र कायम राहिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

महिला कर्मचाऱ्यांशी अशोभनीय वर्तन व अपमानास्पद भाषेचा वापर, मजुरांच्या मजुरीतील विलंब व कथित आर्थिक गैरव्यवहार या आरोपांनी प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. मात्र, एवढ्या सर्व आरोपांनंतरही वरिष्ठ प्रशासनाकडून कारवाईचा अभाव हा संशयास अधिक खतपाणी घालणारा ठरत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, वन विभागात “वरिष्ठ पातळीवर ओळखी असल्याने कुणीही काही बिघडवू शकत नाही,” अशा प्रकारची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये रंगू लागली आहे. काही अतिरिक्त वन अधिकाऱ्यांचाही या प्रकरणात अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे बोलले जात असून, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे मनोबल अधिकच वाढल्याची भावना व्यक्त होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, “न्याय मिळत नसेल तर संघर्ष अपरिहार्य” या भूमिकेतून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. हा संघर्ष केवळ एका अधिकाऱ्याविरोधात नसून, संपूर्ण वन प्रशासनातील अपारदर्शकता, दडपशाही आणि कथित भ्रष्टाचाराविरोधात उभा ठाकलेला आहे.

आलापल्लीतील हा उद्रेक आता व्यवस्थेतील खोलवरच्या प्रश्नांना उघडे पाडत आहे. जर तातडीने निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर हा असंतोष आणखी व्यापक रूप धारण करण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. आता प्रशासन कारवाई करणार की मौन ठेवून या व्यवस्थेला पाठीशी घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.