विनोबा ॲपमधील जिल्हा विजय : रवी यमसलवार यांचा गौरव
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील शिवनीपाठ शाळेने डिजिटल शिक्षणाच्या स्पर्धेत ग्रामीण शाळाही आता मागे नाहीत, याची ठोस साक्ष दिली आहे. जिल्हा परिषद गडचिरोली व Open Link Foundation यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘विनोबा ॲप’ उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शिवनीपाठ (बोरी केंद्र) येथील शिक्षक रवींद्र रत्नाकर यमसलवार यांना ‘जिल्हा विजय किट’ प्रदान करून गौरविण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी बोरी केंद्राचे केंद्रप्रमुख राजू आत्राम तसेच विनोबा उपक्रमाचे जिल्हा समन्वयक चंदन रापरतीवार उपस्थित होते. सत्कार प्रसंगी शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाची परिणामकारक सांगड घालणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक अध्यापन पद्धती पोहोचविण्याची गरज ओळखून यमसलवार यांनी ‘विनोबा ॲप’च्या माध्यमातून नियमित, सातत्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि अभ्यासातील रुची वाढविण्यासाठी घेतलेल्या विविध कृतीमुळे शिवनीपाठ शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अध्यापनाविषयी उत्साह निर्माण झाला आहे.
“तंत्रज्ञान ही केवळ सुविधा नसून शिक्षणातील परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे. अशा उपक्रमशील शिक्षकांमुळे जिल्ह्यातील शिक्षण गुणवत्तेला नवे परिमाण मिळत आहे,” असे मत गटशिक्षणाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले.
ग्रामीण शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची पायाभरणी करत ‘विनोबा ॲप’ उपक्रमाने केवळ शैक्षणिक दर्जा उंचावला नाही, तर शिक्षकांच्या नवकल्पनांना व्यासपीठही उपलब्ध करून दिले आहे. रवींद्र यमसलवार यांचा हा सन्मान जिल्ह्यातील इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हे देखील वाचा,
देव मार्कंडाच्या वैनगंगेत खोल पाण्यात बुडणाऱ्या तिघांना पोलिसांनी वाचवले
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पुरोगामी नेतृत्व हरपले


Comments are closed.