Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरमोरी न.प.चे ७० सफाई कामगार कुटुंबासाहित करणार १६ जूनला चक्काजाम आंदोलन

सफाई कर्मचाऱ्यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

आरमोरी – नगरपरिषदेने ३ महिन्यापासून कामावरून बंद केलेल्या सफाई कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे. आरमोरी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना किमान वेतनानुसार बँकेतुन वेतनअदा करण्यात यावे, सफाई कामगारांचा भविष्य निर्वाह निधी व विमा काढण्यात यावा, मुख्याधिकारी व संबंधित अभियंता यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, आदी मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरमोरी नगरपरिषदेतील ७० सफाई कामगार आपल्या कुटुंबासाहित दिनांक १६ जूनला जुन्या बसस्टॉपवर शिवसेनेचे सुरेंद्रसिंह चंदेल,अविनाश गेडाम, आदिवासी काँग्रेस सेलचे सचिव दिलीप घोडाम, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष निखिल धार्मिक यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती सफाई कामगार संघटनेचे प्रमुख पुरुषोत्तम बलोदे, अक्षय भोयर,स्वप्नील राऊत,रेखा कांबळे ,यांनी पत्रकारपरिषदेत दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलतांना पुरुषोत्तम बलोदे म्हणाले की, आरमोरी येथील सफाई कामगारांनी ९ एप्रिल पासून कामबंद आंदोलन केले .परंतु आरमोरी येथील मुख्याधिकारी,संबंधित अभियंता व कंत्राटदाराने सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने मागील ३ महिन्यापासून सफाई कामगारांवर उपासमारीची पाळी आली असून, संबंधित ठेकेदाराने सर्व सफाई कर्मचाऱ्यांना वेतन अदा न करता कामावरून काढून टाकल्याचा निंदनीय प्रकार केला आहे. सफाई कामगारांना यथोचित न्याय न देता त्यांना बेकारीचे जीवन देण्यात मोठा हातगंडा असणारे मुख्याधिकारी व संबंधित अभियंता मात्र गप्प बसले आहेत.मात्र मुख्याधिकारी यांनी सफाई कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंत्राटदारावर कुठलीही कारवाई न करता त्याला याउलट बगल देण्याचा विडा उचलला असून सफाई कामगारांचीच चूक असल्याचा खोटा अहवाल दिला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरमोरी नगरपरिषदेची निर्मिती झाल्यापासून आरमोरी येथील ७० सफाई कामगार उन्हातान्हात राबून काबाडकष्ट प्रामाणिकपणे करीत आहेत. शासनाच्या नियमानुसार त्यांना दिवसाकाठी ५०७/-रुपये रोजी मिळायला पाहिजे.म्हणजेच महिन्याकाठी त्यांना १२ ते १५ हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे.परंतु संबंधित कंत्राटदाराने या ७० ही सफाई कर्मचाऱ्यांचे बँकेचे खाते पुस्तिका आपल्याकडे ठेऊन, त्यांना केवळ महिन्याकाठी फक्त ४ ते ५ हजार रुपये हातात देऊन त्यांचे आर्थिक शोषण करीत आहे.

कंत्राटदाराने सदर कंत्राट घेतांना नगरपरिषदेला करारनामा करून देताना अटी व शर्ती लक्षात घेऊन किमान वेतन कायद्यानुसार वेतन व त्यांचे वेतन बँकेतुन अदा करण्यात येईल असे लिहून दिले आहे.परंतु कंत्राटदाराने सदर करारनाम्याला केराची टोपली दाखवून आपली मनमर्जी दाखवली. ही बाब मुख्याधिकारी यांना माहीत असून सुद्धा त्यांनी सफाई कामगारांच्या समस्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कंत्राटदाराच्या शोषणाला व पिळवणुकीला कंटाळून आम्ही सफाई कामगारांनी अनेकदा तहसीलदार, जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त यांना वेळोवेळी निवेदन देऊन कंत्राटदाराची पिळवणूक व शोषणाविरुद्ध व आम्ही सफाई कामगारांच्या न्यायासाठी प्रार्थना केलेली आहे. परंतु मुख्याधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी कामगारांच्या रास्त मागण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले.

त्यामुळे हतबल व निराश होऊन कामगारांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पूर्वसूचना देऊन दिनांक ९ एप्रिल पासून सर्व काम बंद आंदोलन सुरू केले परंतु आमच्या आंदोलनाची कंत्राटदार तसेच मुख्याधिकारी, तहसीलदार जिल्हाधिकारी यांनी कोणतीही दखल घेतली नाही. उलट कंत्राटदार दीपक उत्तराधी यांनी कामगारांच्या बेरोजगारीचा फायदा घेऊन अधिक स्वस्तात कोणत्याही कामाचा अनुभव नसलेल्या १० ते २० कामगारांना बेकायदेशीर कामावर घेऊन आमच्याशी चर्चा न करता दिनांक १० एप्रिलपासून कामाला सुरुवात केली व आम्ही जुन्या सत्तर सफाई कामगारांना कामावरून बंद केले त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.

पत्रकारपरिषदेत बोलताना दिलिप घोडाम म्हणाले की, न. प. तील ७० ही सफाई कामगार मागील ४ ते ५ वर्षांपासून सातत्याने काम करीत आहो. सदर कंत्राटदार कामगारांचे आर्थिक शोषण करीत असूनही मुख्याधिकारी व सबंधित अभियंता हे कंत्राटदारांची पाठराखण करीत आहेत. व नगरपरिषदेचे पदाधिकारी यांनी कोणताही मार्ग न काढता शांत बसले आहेत. संबंधित कंत्राटदाराने केलेल्या कारारनाम्यानुसार अटी व शर्तीचे पालन केले नाही. व कामगारांना कामावरून काढले.अशा कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे असे ते म्हणाले.

२ दिवसात कामगारांच्या मागण्या निकाली न निघाल्यास १६ जूनला कुटुंबासाहित चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा सफाई कामगारांनी दिला.

पत्रकार परिषदेला दिलीप घोडाम,निखिल धार्मीक तसेच सफाई कामगार संघटनेचे पुरुषोत्तम बलोदे, अक्षय भोयर, स्वप्नील राऊत, रेखा कांबळे, रीना बांबोळे, वर्षा खेडकर ,वर्षा गुरनुले ,वनिता बोरकर ,अविनाश उके, भाऊराव दिवटे, हरिदास गराडे ,साधना गजभिये ,रमेश भोयर ,साधना गजभिये ,गुणवंत रामटेके ,उमेश रामटेके, तुकाराम बावणे, उमेश खोब्रागडे, दशरथ दुमाने, राजू नागदेवें, रेखा कांबळे, त्रिशला गोवर्धन, ज्योती मोगरे, कुसुम मेश्राम, गीता शेडमाके, सुरेख मेश्राम, अलका भोयर, राजेश मून, संगीता कांबळे, मंगल मोटघरे, सचिन बोडलकर, कल्पना साळवे, मंगला मोटघरे, मारोती कोल्हे, आकाश कोल्हे, नितीन मेश्वराम, प्रज्ञा खरकाटे, सरिता सोनटक्के व इतर कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा  :

वाहणाऱ्या वृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ करण्यात मग्न; शेवटी नाल्यात वाहून दुर्दैवी मृत्यू

आर्टलाईनने ‘जिवंत’ ठेवली कलाकारांची हार्टलाईन

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उद्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.