Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिरोंच्यातील घरफोड्यांमागील गुन्हेगार गजाआड; ११ चोरींचा पर्दाफाश, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : सिरोंचा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घरफोडींच्या मालिकेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गडचिरोली पोलिसांनी तडाखेबाज कारवाई करत ११ चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत अडीच लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत एक सराईत गुन्हेगार अटकेत असून, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि प्रभारी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम हाती घेतली होती. त्या अनुषंगाने ९ मे रोजी सिरोंचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक रात्रगस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका संशयितास ताब्यात घेण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोत्तापल्लीचा आरोपी अखेर जेरबंद…

आकाश नागया कोत्तापेल्ली (वय २०, रा. कोत्तापल्ली, ता. सिरोंचा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पुढील चौकशीत त्याने सिरोंचा पोलिस ठाण्याच्या हद्दीत व असरअल्ली परिसरात घडलेल्या तब्बल ११ चोरीच्या घटना कबूल केल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोलिसांनी त्याच्या कबुली जबाबावरून विविध ठिकाणी छापे टाकत मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती साहित्य, सिव्हिल कामाचे साहित्य, कपडे आदी मुद्देमाल असा एकूण रु. २,५१,७००/- किंमतीचा माल जप्त केला. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पूर्वीही सात गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कोठडी मिळाल्याने आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता…

१० मे रोजी आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपासदरम्यान आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी…

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

प्रभारी अधिकारी समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मारोती नंदे, ज्ञानेश्वर धोत्रे, पोउपनि. नरेंद्र वांगाटे, प्रांजली कुलकर्णी,  लावण्या जक्कन, पोहवा मनीष गर्गे, सुनिल घुगे, राकेश नागुला, मानतेश दागम, सुनील राठोड आणि संतोष भताने यांनी विशेष मेहनत घेतली.

Comments are closed.