चाईल्ड लाईन तर्फे मुलांना स्वेटर वाटप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलडाणा, 10 जानेवारी:- समाजातील गरजू निवाराहिन झोपडी परिसरात राहणार्या मुलांना थंडीपासून संरक्षण मिळण्याकरीता भारतीय बहुउद्देशिय लोक शिक्षण संस्था व चाईल्ड लाईन कडून मोफत स्वेटर व कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन 8 जानेवारी रोजी मलकापूर रोड पालवस्ती परिसर या ठिकाणी करण्यात आले होते.
चाइल्ड लाईन संचालक जिजाताई चांदेकर प्रकल्प समन्वयक शेख सोहेप, समुपदेशक संध्या घाडगे, चमू सदस्य अमोल पवार, प्रविण गवई यावेळी उपस्थित होते. तेव्हा मजकापूर रोड पालवस्ती या ठिकाणी राहणाछया नागरिक व मुलांनी या कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभाग दर्शविला. प्रकल्प समन्वयक शेख सोहेप यांनी मुलांना 1098 बद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, चाइल्ड लाईन 1098 हा प्रकल्प 0 ते 18 वयोगटातील जी मुले अनाथ, बेवारस, हरविलेली, बालकामगार, बालविवाह, शिक्षणापासून वंचित असणारी भिक मागणारी मुले, शोषीत, घरातून पळून गेलेली मुले, समुपदेशनाची गरज असणारी मुले, अपंगत्व व वैद्यकीय मदतीची आवश्यकता असणार्या मुलांना संरक्षण व मदत देण्याचे काम करते. अशा प्रकारची समस्याग्रस्त मुले जिल्ह्यात कुठेही आढळल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यानंतर चाइल्ड लाईन चमूच्या वतीने मलकापूर पालवस्ती परिसरात राहणार्या मुलांना मोफत स्वेटर व कपडे वाटप करण्यात आले. जिजाताई चांदेकर ह्यांनी मलकापूर पालवस्ती परिसरात राहणार्या मुलांना कुठल्याही प्रकारच्या समस्या आल्यास चाइल्ड लाईन 1098 क्रमांकावर फोन करण्याचे तसेच अशा गरजू व निवाराहिन मुलांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले.
Comments are closed.