कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन अलर्ट
- विविध व्यापारी, डॉक्टर व राजकीय संघटनांचे प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी यांची चर्चा
- सुपरस्प्रेडरचे सुक्ष्म नियोजन करणार
- पुन्हा सिरो सर्व्हे करणार
- लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करण्याचे निर्देश
- मास्कचा वापर, हात धुणे व सामाजिक अंतर या त्रीसुत्रीविषयी जनजागृतीवर भर
चंद्रपूर, दि. 18 फेब्रुवारी : नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती इ. जवळच्या जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असून काही ठिकाणची 20 ते 22 वरील दैनिक कोरोनाबाधीतांची संख्या अचानक 500 च्या घरात गेली आहे. चंद्रपूरमध्ये अशी परिस्थिती येवू नये म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रशासन, राजकीय पक्ष, विविध व्यापारी व सामाजिक संघटना यांचेशी सातत्याने व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेवून नागरिकांमध्ये कोरोनाचे नियम पाळण्याविषयी जनजागृती करण्याबाबत व कोणतीही विषम परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना टास्क समितीच्या बैठकीत कोरोनाची लागन व फैलाव होण्याची जास्त शक्यता असणाऱ्या सुपरस्प्रेडर यांना वृत्तपत्र विक्रेते, भाजी विक्रेते, दुधवाले, किराणा दुकारणदार, केश कर्तनालय, बॅण्डवाले, कॅटरींग कामगार, रोजंदारी मजूर अशा विविध गटात विभागून त्यांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. तसेच शासकीय रुग्णालयातील ऑक्सीजन बेड, औषध साठा व मनुष्यबळ योग्य प्रमाणात उपलब्ध ठेवण्याचेही निर्देश दिले.
नागरिकांमधील कोरोना प्रतिकारशक्ती जाणून घेण्यासाठी सिरो सर्व्हे केल्यास त्यातुन पुढील धोका ओळखून उपायोजनेसंबंधी कार्यवाही करणे सोईचे होईल असे सांगून त्यांनी विविध ठिकाणचे 5 हजार नागरिकांचे सिरो सर्व्हे करण्याचेही निर्देश दिले. डॉक्टरांनी रुग्णांमध्ये कोरोनासदृष्य लक्षणे दिसल्यास विशेषतः मोठ्या प्रमाणात खोकला असलेल्या रुग्णांना ताबडतोब कोरोना तपासणीकरिता पाठवण्याची सूचना त्यांनी केल्या. तपासणीद्वारे आजाराची माहिती वेळेवर मिळाल्यास उपचार करणे व कोरोनाचा फैलावर रोखणे सोयीचे होईल व जीव जाण्याचा धोका कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
राजकीय पक्षांनी देखील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याविषयी तसेच व्यापारी वर्गाने मास्क नाही तर प्रवेश नाही ही मोहीम राबविण्याचे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले.
100 टक्के नागरिकांनी मास्कचा वापर केल्यास व सामाजिक अंतर पाळल्यास कोरोनाचा एकही रुग्ण निघणार नाही. आपण स्वत: व आपल्या संपर्कातील सर्वांना समाजाचा जबाबदार घटक म्हणून मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर राखणे या त्रीसुत्रीचा वापर करण्यास उद्युक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र सुरपाम, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. साठे, इ. प्रामुख्याने उपस्थित होते. तर व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कांचनवार, तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
Comments are closed.