कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर “छत्रपती शिवाजी महाराज जयंती ” करिता जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायगड 17 फेब्रुवारी :- कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. 19 फेब्रुवारी, 2021 रोजी साजरी होणारी “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने शासनाकडून व जिल्हा प्रशासनाकडून पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत :-
1) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दि.19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि.18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12.00 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
2) दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
3) तसेच, कोणत्याही प्रकारे फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
4) शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ शिबिरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे
5) कोविड-19 च्या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे / निर्देशांचे तसेच सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
6) कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी व्यक्तींमध्ये भौतिकदृष्ट्या कमीत कमी संपर्क येईल, याची दक्षता घ्यावी. निर्जंतूकीकरणाची तसेच सनिटायझिंग, थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम (Mask, Sanitizer, etc.) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
7) कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे यापूर्वी घोषित केलेल्या अथवा नव्याने घोषित केल्या जाणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्राच्या बाबतीत शासनाने/सक्षम प्राधिकारी यांच्या आदेशानुसार प्रतिबंध लागू राहतील.
सद्य:स्थितीत प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे व नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे चांगल्या प्रकारे पालन केल्यामुळे कोविड-19 साथरोग नियंत्रणात असून, गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर कोविड-19 पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी संबंधितांना कोविड-19 चा प्रादूर्भाव टाळण्यासाठी दिलेल्या निर्देशाबाबत लिखित स्वरुपात वेळेपूर्वी कळवावे. वरीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना व्यतिरिक्त प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या कालावधीत शासन / प्रशासनाकडून काही अतिरिक्त सूचना प्रसिध्द झाल्यास अथवा नियम विहीत केले गेल्यास त्यांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असे रायगड जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
Comments are closed.