गृहमंत्र्यांकडे पीडितांचे अश्रू पुसायला वेळ नाही.. भाजपच्या चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका
उस्मानाबाद, दि. 2 फेब्रुवारी: राज्यात अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशावेळी गृहमंत्र्यांना गावगुंडांबरोबर फोटो काढायला वेळ आहे, परंतु पीडितांचे अश्रू पुसायला वेळ नाही, अशा शब्दांत भाजपच्या महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व राज्य सरकारवर टीका केली.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार दिवसांपूर्वी सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यामुळे अणदूर ग्रामस्थांनी रविवारी या प्रकरणातील फरार झालेल्या आरोपींना तत्काळ अटक करावे, या मागणीसाठी गाव बंद करून निषेध नोंदविला होता. त्यानंतर मंगळवारी भाजपच्या चित्रा वाघ यांनी अणदूर व नळदुर्ग येथे जावून पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेवून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर उस्मानाबाद येथे वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी असा नारा दिला.
राज्यातील सर्व महिलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची आहे. मग अशा घटना राज्यात का घडत आहेत? असा सवाल उपस्थित करीत एका दिवसात राज्यात तीन-तीन अत्याचाराच्या घटना दुर्दैवाने घडत आहेत. त्यामुळे राज्यात शिवशाही नाही, मोगलाई आहे. अत्याचाराच्या घटनांतील आरोपींना पकडले जात नाही. जोपर्यंत महिलांना संरक्षण देण्याची मानसिकता पोलिसांची होत नाही, तोपर्यंत कोणतेही कायदे महिलांचे रक्षण करू शकणार नाहीत, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. त्याचबरोबर राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना थांबविण्यासाठी आरोपींवर ठोस कारवाई करावी, अन्यथा भाजपाच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ट दत्ता कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस अॅड. नितीन भोसले, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी गरड, दीपक आलुरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.