160 बलात्काराच्या घटना घडल्यावर रेल्वेला आली जाग.
सुरू केले ‘मेरी सहेली’ अभियान.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई 2 नोव्हेंबर:- भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये आणि रेल्वे परिसरात 160 पेक्षा जास्त बलात्काराच्या घटना तर 1600 पेक्षा जास्त महिला प्रवाशांशी छेडछाडीच्या आणि इतर घटना घडल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली होती. त्यानंतर भारतीय रेल्वेने याची दखल घेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक उपायोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसारच आता भारतीय रेल्वेने महिला प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी ‘मेरी सहेली’ अभियान सुरु केले आहे. या अभियानातंर्गत महिला प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षा पुरविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
भारतीय रेल्वेने लांबपल्याच्या रेल्वे गाड्यात एकट्या प्रवास करणार्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘मेरी सहेली’ अभियानाची सुरुवात केली आहे. ज्यामध्ये महिला प्रवाशांना आरपीएफच्या महिला कर्मचारी व अधिकारी प्रवासात महिलांची विचारपूस करणार आहे. तसेच प्रवासात होणार्या त्रासाबद्दल माहिती करुन घेणार आहेत. त्यांना काही समस्या असल्यास त्वरित त्याचे निदान करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे गाडीतून प्रवास करणार्या महिला प्रवाशांच्या आसन क्रमांकांची नोद आरपीएफ महिला जवानांकडे असणार आहे. तसेच महिला प्रवाशांना आत्मरक्षणाचे धडेसुध्दा आरपीएफकडून देण्यात येणार आहेत. याचबरोबर सुरक्षेसाठी असलेल्या 182 या हेल्पलाईनची माहिती त्यांना देण्यात येणार आहे. सहप्रवाशांकडून कुठलेही खाद्यपदार्थ घेऊन नये, त्यांना आपल्या प्रवासाबाबत माहिती देऊ नका, खाद्यपदार्थ आयआरसीटीसीच्या पेंट्रीकारमधूनच खरेदी करा, खिडकीजवळ बसताना आपल्या दागिन्यांची काळजी घेणे तसेच फिजिकल डिस्टन्स ठेऊन तोंडाला मास्क लावणे आदी सुचना या अभियानात देण्यात येणार आहेत. यामुळे महिला प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता येईल, असा विश्वास भारतीय रेल्वेला आहे.
165 बलात्काराच्या घटना
माहिती अधिकारी कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी भारतीय रेल्वेकडे महिलांवर होणार्या गुन्हेगारीची आरटीआयतंर्गत माहिती मागविण्यात आली होती. भारतीय रेल्वेने सांगितले की, 2017 पासून 2019 यादरम्यान रेल्वे परिसरात आणि धावत्या ट्रेनमध्ये बलात्काराच्या 165 घटना घडल्या आहेत. ज्यात 2017 मध्ये 51 तर 2018 मध्ये 70 आणि 2019 मध्ये 44 अशा 165 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तर महिलांवर बलात्काराव्यतिरिक्त छेडाछेडीच्या एकूण 1672 घटना घडल्या आहेत.
Comments are closed.