गोंडवाना विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात महिला तक्रार निवारण समितीविषयी माहिती सत्राचे आयोजन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या पदव्युत्तर इंग्रजी विभागातर्फे “महिला तक्रार निवारण समिती : विद्यार्थिनींसाठी माहिती सत्र” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच विद्यापीठात कार्यरत असलेल्या तक्रार निवारण यंत्रणेची माहिती देणे हा होता.
कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्या डॉ. शिल्पा आठवले यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यापीठात विद्यार्थिनींसाठी सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी समितीची भूमिका किती महत्त्वाची आहे यावर प्रकाश टाकला. शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा छळवणुकीसंदर्भात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, समितीची कार्यपद्धती, तसेच विशाखा मार्गदर्शक तत्त्वे आणि कायदेशीर तरतुदी यांची सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थिनींसमोर ठेवली.

डॉ. आठवले यांनी विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करता तत्काळ योग्य ठिकाणी तक्रार नोंदविण्याची कार्यपद्धती तसेच विद्यापीठ प्रशासन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या माहिती सत्रामध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांनी तक्रार प्रक्रियेविषयी शंका विचारून त्यांचे निरसन केले.
कार्यशाळेचा प्रमुख उद्देश विद्यार्थिनींना त्यांचे हक्क, सुरक्षा यंत्रणा आणि उपलब्ध मदत सेवांबाबत जागरूक करणे हा होता, जो या सत्राद्वारे यशस्वीपणे साध्य झाला. माहिती सत्रास अध्यक्ष म्हणून इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्रो.विवेक जोशी उपस्थित होते व डॉ. वैभव मसराम, डॉ. प्रमोद जावरे, डॉ.अतुल गावस्कर व इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला.


Comments are closed.