मावा नाटे, मावा सरकार : पड्यालजोबची लोकशाही विद्यार्थ्यांच्या दारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, : लोकशाही केवळ संविधानाच्या पानांमध्ये नसते, ती मातीच्या गंधात, सामूहिक श्रमात आणि गावकऱ्यांच्या निर्णयक्षमतेत रुजलेली असते—याचा प्रत्यय गोंडवाना विद्यापीठच्या पदव्युत्तर इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांना कोरची तालुक्यातील पड्यालजोब येथे आला. ‘अनुभूती’ कम्युनिटी आउटरिच प्रोग्रामच्या तिसऱ्या पर्वात विद्यार्थ्यांनी ‘मावा नाटे, मावा सरकार’ या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव घेत ग्रामलोकशाहीचा जिवंत धडा शिकला.
जिल्ह्याच्या टोकावर वसलेले पड्यालजोब हे गाव आज आदिवासी स्वायत्ततेचे आणि लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या विकास मॉडेलचे उदाहरण बनले आहे. ग्रामसभेच्या पुढाकारातून गावकऱ्यांनी स्वतःच्या श्रमदानातून उभारलेला जलसाठा—गोंडी भाषेत ‘उस्माल गाटूम’—हा केवळ बांध नाही; तो स्वनिर्णयाच्या सामर्थ्याचा प्रतीक आहे. या प्रकल्पाची माहिती जोहान पोरेटी यांनी विद्यार्थ्यांना देताना जलसंवर्धन, पारंपरिक मत्स्यव्यवसाय आणि शेतीसाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता कशी साध्य झाली, याचा सविस्तर ऊहापोह केला.
पड्यालजोब ग्रामसभेने Forest Rights Act अंतर्गत प्राप्त सामुदायिक वनहक्कांचा परिणामकारक वापर करून विकास आणि पर्यावरण यांची सांगड घातली आहे. ‘मनरेगा’च्या प्रभावी अंमलबजावणीसह दहा वर्षांचा वनव्यवस्थापन आराखडा तयार करत ग्रामसभेने नियोजनबद्ध पद्धतीने आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. निसर्गसंवर्धन आणि उत्पन्ननिर्मिती यांचा समतोल राखत उभे राहिलेले हे मॉडेल इतर गावांसाठी दिशादर्शक ठरत आहे.
कोरची तालुका महाग्रामसभेचे अध्यक्ष राजाराम नैताम यांनी विद्यार्थ्यांना महाग्रामसभेची रचना, अधिकार आणि निर्णयप्रक्रियेची माहिती दिली. लोकशाहीतील ग्रामसभेचे केंद्रस्थान आणि आदिवासी समुदायाची स्वायत्तता ही केवळ सैद्धांतिक बाब नसून ती व्यवहारात कशी उतरते, हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. ग्रामसभा अध्यक्ष महारू पोरेटी, सचिव मदन पोरेटी आणि युवक वर्गाच्या उपस्थितीत संवाद अधिक जिवंत झाला.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील मुलांशी संवाद साधत शिक्षण, संस्कृती आणि विकास यांच्यातील नाते समजून घेतले. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी पारंपरिक ‘रेला’ नृत्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला; त्या तालात सामूहिकतेची शक्ती आणि संस्कृतीची सातत्यशीलता अनुभवास आली.
इंग्रजी विभागप्रमुख प्रा. विवेक जोशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. वैभव मसराम आणि सह-समन्वयक डॉ. प्रमोद जावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अनुभूती’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यालयीन कर्मचारी योगिता कुंभारे आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम केवळ अभ्यासभेट न ठरता सामाजिक जाणिवांचा प्रवास ठरला.
हे देखील वाचा,
देव मार्कंडाच्या वैनगंगेत खोल पाण्यात बुडणाऱ्या तिघांना पोलिसांनी वाचवले
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पुरोगामी नेतृत्व हरपले

