मुंबई महानगरपालिकेचं कर्मचाऱ्यांसाठी १५ हजारांचा दिवाळी बोनस.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई महानगर पालिकेने अखेर पालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या आधी बंपर गिफ्ट जाहीर केलं आहे. पालिका कर्मचाऱ्यांसाठी २०१९-२० या वर्षासाठी १५ हजार ५०० रुपये इतका बोनस देण्याची घोषणा महानगर पालिकेकडून करण्याता आली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत महानगर पालिकेमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना मुंबई महानगर पालिकेकडून खुशखबर मिळाली आहे. यामध्ये पालिका कर्मचारी, शाळेतील शिक्षक-कर्मचारी, आरोग्य स्वयंसेविका अशा वेगवेगळ्या श्रेणींसाठी ही घोषणा करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कर्मचाऱ्यांना मागील वर्षांच्या तुलनेत ५०० रुपयांनी वाढ करून देण्याची तयारी दर्शवली होती.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार समय वेतनश्रेणीतील कामगार-कर्मचार्यांना १५ हजार ५००, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील कर्मचारी-शिक्षकांना ७ हजार ७५०, शिक्षण खात्याच्या मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना ४ हजार ७०० तर अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना २३५० रुपये इतका बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याशिवाय सामाजिक आरोग्य स्वयंसेविका अर्थात CHV यांना भाऊबीज भेट म्हणून ४ हजार ४०० रुपये देण्यात येणार आहेत. यासंदर्भातलं परिपत्रक मुंबई महानगर पालिकेकडून जाहीर करण्यात आलं आहे.
Comments are closed.