महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा ‘सिटीझन ऑफ मुंबई’ या प्रथितयश पुरस्काराने गौरव
कोविड काळात समर्पित भावनेने काम करणाऱ्या महापालिका कामगार व कर्मचाऱ्यांना पुरस्कार केला अर्पण
‘रोटरी क्लब’द्वारे देण्यात येणारा ‘सिटीजन ऑफ मुंबई’ हा पुरस्कार देऊन यापूर्वी अनेक महनीय व्यक्तींचा करण्यात आला आहे गौरव
मुंबई डेस्क, दि. ६ फेब्रुवारी: महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेने सामुहिक भावनेने ‘कोविड’ – ‘कोरोना’ या साथ रोगाच्या काळात अक्षरश: दिवस-रात्र काम करुन मुंबईकरांची सेवा केली. याच अनुषंगाने ‘सिटीझन ऑफ मुंबई’ या प्रथितयश पुरस्काराने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा विशेष गौरव ‘रोटरी क्लब ऑफ मुंबई’चे अध्यक्ष फ्रामरोज़ मेहता यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. याप्रसंगी रोटरी क्लबच्या सार्वजनिक पुरस्कार समितीच्या अध्यक्षा स्वाती मळेकर यादेखील उपस्थित होत्या. हा पुरस्कार यापूर्वी बी. जी. देशमुख, न्यायमूर्ती सुजाता मनोहर, डॉक्टर रघुराम राजन, दीपक पारेख यासारख्या महनीय व्यक्तींना प्रदान करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
महापालिका मुख्यालयात आयोजित एका विशेष समारंभात व मान्यवरांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्तांना ‘सिटीजन ऑफ मुंबई’ हा पुरस्कार प्रदान करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना महापालिका आयुक्तांनी त्यांचा करण्यात आलेला हा गौरव खऱ्या अर्थाने महापालिकेच्या सर्व कामगार-कर्मचारी व अधिकाऱ्यांचा असल्याचे नमूद करत पुरस्कार त्यांना व महापालिकेच्या सामुहिक भावनेला समर्पित केला आहे.
या कार्यक्रमापूर्वी ‘रोटरी क्लब’ द्वारे ऑनलाइन स्वरूपाच्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या सदर सोहळ्यास मुंबई रोटरी क्लबचे मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.