“बातमीचा सूड! पत्रकाराचे बसस्थानकातून अपहरण – दहशतीचा नाट्यपूर्ण कट”
बातमीतून सत्य बाहेर येताच गँगस्टर टोळीने चक्क विरोधात जाऊन पत्रकाराचे बसस्थानकातून अपहरण करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट तक्रारीत करतात पोलिसांनी हाणून पाडला...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार, रायगड : “एक पत्रकार काय लिहितो, याचा सूड काढण्यासाठी चक्क त्याचे अपहरण होते… दहा-बारा जणांची टोळी एका सामान्य पत्रकाराच्या जिवावर उठते, खोटं नाट्य तयार करत खंडणीच्या गुन्ह्यात फसवण्याचा बनाव करते… आणि ही सगळी स्क्रिप्ट उघडकीस यायला लागते तेव्हा लोकशाहीचा चौथा स्तंभ हादरतो!”
रोहे तालुक्यातील निवी गावचे पत्रकार समीर बामुगडे यांच्या बाबतीत घडलेली ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर भयावह आहे. एका बातमीचा सूड घेण्यासाठी बामुगडे यांचे चक्क पनवेल बस स्थानकातून अपहरण करण्यात आले. दहा-बारा जणांच्या गँगने त्यांना जबरदस्तीने गाडीत कोंबून रोहा, म्हसळा, आणि शेवटी मंडणगड पोलीस ठाण्यापर्यंत नेले. वाटेत मारहाण, धमकी, खोटे रेकॉर्डिंग, खिशात नोटा कोंबून खंडणीचा बनाव आणि मानसिक छळ… एवढ्या सगळ्या यातना सोसत ते कुठेही न्याय मागू शकले नाहीत, जोपर्यंत पोलीस ठाण्यात एक किरकोळ आशा उगवली नाही.
सकाळी रोहा-पनवेल बसने कामासाठी निघालेल्या बामुगडे यांच्यावर पनवेल स्थानकात ही घटना घडली. विजय काते, त्याची पत्नी स्वाती, मुलगा विराज, भाऊ अरविंद, आणि ओळखीच्या इतरांमधील स्वाती वावडेकर, उत्तम जाधव या टोळीने थेट सार्वजनिक ठिकाणी त्यांना घेरले. कोणतीही तक्रार किंवा खुलासा ऐकण्याऐवजी त्यांनी समीर यांचा मोबाईल हिसकावून घेतला, आणि त्यांना जबरदस्तीने गाडीत कोंबले. वाटेत त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ चालूच होता. त्यांच्या खिशात नोटा टाकून त्यांच्यावर खंडणी मागितल्याचे बनाव तयार करण्यात आले.
या टोळीने पत्रकाराला म्हसळ्यातील एका शक्तीपीठात नेऊन ‘स्क्रिप्टेड’ कबुलीजबाब रेकॉर्ड केला. त्यानंतर पुन्हा मंडणगड परिसरात घेऊन जाऊन त्याच्यावर पुन्हा दबाव टाकण्यात आला. हे सर्व करताना या टोळीचा उद्देश एकच होता — पत्रकाराला ‘खंडणी मागणारा’ ठरवून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणे.
मात्र मंडणगड पोलिसांच्या सजगतेने आणि पत्रकाराच्या धैर्यामुळे हा कट पुरता उघड झाला. पोलिसांनी रेकॉर्डिंग ऐकूनच या प्रकारात काहीतरी गडबड असल्याचे हेरले. बामुगडे यांची तातडीने सुटका झाली. मात्र त्यांचे म्हणणे स्पष्ट होते — “माझ्या एका बातमीमुळे हे सगळे घडले, आणि आजही ही टोळी माझ्या जिवाला धोका निर्माण करत आहे.”
बामुगडे यांनी पनवेल पोलीस ठाण्यात या टोळीविरोधात अपहरण, दहशतीचा प्रयत्न, खोट्या पुराव्यांच्या आधारे फसवणूक आणि जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत सविस्तर लेखी तक्रार दिली आहे. त्यांच्यावर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
ही घटना एकच सांगते — पत्रकारितेचा एकेक शब्द जर सत्ताधाऱ्यांना, बनावट अधिकाऱ्यांना आणि गुन्हेगार टोळ्यांना खुपू लागला, तर त्या शब्दावर सूड घेण्याची तयारी ही मंडळी ठेवतात. ही केवळ एका पत्रकारावरची हल्ला नव्हे, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा क्रूर हल्ला आहे.
हा हल्ला फक्त समीर बामुगडे यांच्यावर नव्हता… तो प्रत्येक स्वतंत्र पत्रकारावर होता, जो खोटं उघड करतो, आणि सत्य मांडतो. आता प्रशासकीय यंत्रणेने या प्रकरणात तत्काळ कठोर गुन्हे दाखल करून या ‘गँग’चा बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे — कारण हा लढा केवळ एका पत्रकाराच्या सुरक्षेचा नाही, तर संपूर्ण पत्रकारितेच्या अस्तित्वाचा आहे.