प्रोजेक्ट उडान’ने घेतली भरारी! गडचिरोली पोलिसांचा स्पर्धा परीक्षा सराव पेपर उपक्रम – दुर्गम भागातील ४२०० विद्यार्थ्यांचा सहभाग…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, ५ जुलै: शासनसंस्था, नागरी समाज आणि पोलिस यांच्यातील सकारात्मक समन्वयाच्या बळावर गडचिरोली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरलेला ‘प्रोजेक्ट उडान’ उपक्रम यशस्वीतेकडे मार्गक्रमण करत आहे. गडचिरोली पोलिस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या आणि यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सराव पेपरला जिल्ह्यातील तब्बल ४२०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हा सराव पेपर एक गाव, एक वाचनालय उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ७१ पोलिस ठाणे, उपठाणे व मदत केंद्रांमध्ये घेण्यात आला. याशिवाय गडचिरोली पोलीस मुख्यालयातील शहीद पांडु आलाम सभागृहात भरवण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एकट्या १८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आतापर्यंत झालेल्या सात टेस्ट सिरीजमध्ये २४,२०० विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला गेला आहे.
जिल्ह्याच्या दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा येथून आलेल्या विद्यार्थ्यांनीही या संधीचा लाभ घेतला. पोलीस मदत केंद्र पेनगुंडा, पोलीस स्टेशन नेलगुंडा, आणि पोस्टे कवंडे यांसारख्या नव्याने उभारलेल्या ठिकाणांहूनही विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला.
स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढविणे, वाचनसंस्कृतीचा प्रसार करणे, व स्पर्धात्मकतेकडे त्यांचा कल वळवणे हे या उपक्रमामागील उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. आगामी पोलीस शिपाई भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, व राज्यसेवा परीक्षांचा विचार करता, हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोलाची भर टाकणारा ठरतो आहे.
या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, तसेच सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्यांचे प्रभारी, आणि नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पो.उ.नि. चंद्रकांत शेळके यांनी मोठा सहभाग घेतला.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यात अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम म्हणजे फक्त पोलीस अधिकाऱ्यांची नाही, तर संपूर्ण जिल्ह्याची सामाजिक बांधिलकी दर्शवणारे उदाहरण म्हणता येईल. प्रोजेक्ट उडानमधून उभारलेली ही शैक्षणिक चळवळ भविष्यातील अनेक अधिकाऱ्यांची पायाभरणी करणारी ठरेल, हे निश्चित!