शौर्याला साक्ष, कृतज्ञतेला कृतीची जोड! गडचिरोली पोलिसांकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कल्याण शिबिराचे आयोजन..
७० शहीद कुटुंबांची नोंदणी, ७२ जणांची मोफत वैद्यकीय तपासणी..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, ५ जुलै : शौर्याचा आदर शब्दांतून नाही, तर कृतीतून व्यक्त व्हावा लागतो, याचे मार्मिक उदाहरण म्हणजे गडचिरोली पोलिस दलाने आज घेतलेले ‘शहीद सैनिक आश्रित कुटुंब आरोग्य कल्याण योजना’ शिबिर. नक्षलवादाच्या छायेखाली जिवाची बाजी लावणाऱ्या २१३ शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गडचिरोली पोलिस दल, पोलिस रुग्णालय आणि गोंदियाच्या सहयोग हॉस्पिटलने संयुक्तपणे एक भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले.
पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये भरवण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात ७० शहीद कुटुंबांची आरोग्य योजनेत नोंदणी करण्यात आली, तर ७२ कुटुंबीयांची मोफत तपासणी करून त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला. शहीद जवानांचे आई-वडील, पत्नी आणि १८ वर्षांखालील पाल्य या सर्वांसाठी ओपीडी, आयपीडी, आपत्कालीन सेवा, शस्त्रक्रिया आणि सर्व वैद्यकीय सेवा पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन या योजनेअंतर्गत देण्यात आले आहे.
या योजनेचा मुख्य हेतू शहीदांच्या कुटुंबीयांना केवळ आर्थिक नाही, तर भावनिक आणि सामाजिक आधार देणे आहे. या आरोग्य सुविधांमुळे अबालवृद्ध शहीद आश्रितांच्या आरोग्यविषयक गरजांवर दिर्घकालीन तोडगा मिळणार असून, कार्डिओलॉजी, न्युरोलॉजी, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी आदी अत्याधुनिक सेवा गोंदिया येथून सहज उपलब्ध होतील.
या उपक्रमाचे नेतृत्व गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्वतः हाती घेतले होते. त्यांनी आपल्या हस्ते उपस्थित शहीद कुटुंबीयांना नोंदणी प्रमाणपत्रे प्रदान करत त्यांच्याशी संवाद साधला. “शहीदांच्या कुटुंबीयांना हे फक्त एक औपचारिक मदतकार्य न राहता, त्यांच्या दुःखावर फुंकर घालणारी एक जबाबदारीची जाणीव व्हावी, हाच आमचा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मडावी आणि त्यांची टीम, सहयोग हॉस्पिटलचे हेल्थ अँड वेलनेस प्रमुख डॉ. विश्वेश्वर विरुळकर, जनसंपर्क व पोलीस कल्याण शाखा यांचे विशेष सहकार्य लाभले.
गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील भागात शहीदांची संख्या आकडेवारीत मोजली जाऊ शकते, पण त्यांच्या कुटुंबांवरील आघात अनमोजता असतो. गडचिरोली पोलिसांनी त्यांच्या पाठीशी उभं राहून केवळ सुरक्षा नाही, तर माणुसकीही जपली पाहिजे याचे सशक्त उदाहरण घालून दिले आहे.