“विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात… आणि शाळा गप्प! – सात बेकायदेशीर व्हॅन जप्त; १.२५ लाखांचा दंड ठोठावला”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बिनधास्तपणे नियम झुगारून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बेकायदेशीर स्कूल व्हॅनवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने शुक्रवारी कारवाई करत थेट सात वाहने जप्त केली असून संबंधित वाहनधारकांकडून तब्बल १.२५ लाखांचा दंड वसूल केला आहे. शाळा व्यवस्थापनांच्या निष्काळजीपणावर शिक्कामोर्तब करणारी ही कारवाई म्हणजे विद्यार्थ्यांच्या रोजच्या प्रवासात सुरू असलेल्या अपघाती धोरणांचा स्फोटक पर्दाफाश ठरतोय.
शहरातील प्रमुख शाळांच्या परिसरात तपासणी दरम्यान वाहतूक विभागाला गंभीर नियमभंग निदर्शनास आले. काही व्हॅनमध्ये वैध परवाना, विमा अथवा फिटनेस प्रमाणपत्रच नव्हते, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत होती. काही व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांचे दप्तरं टपावर ठेवले जात होते – जे सरळ अपघातास आमंत्रण देणारे प्रकार होते. या पार्श्वभूमीवर कारवाई करत मोटार वाहन कायद्यानुसार सात व्हॅन ताब्यात घेण्यात आल्या.
परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “विद्यार्थ्यांची सुरक्षितता कोणत्याही स्थितीत तडजोड करण्याचा विषय नाही. ही केवळ सुरुवात असून यापुढे अशीच बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर सातत्याने कठोर कारवाई केली जाईल.”
या प्रकारातून मोठा सामाजिक प्रश्न समोर येतो – नियम मोडणारे केवळ वाहन चालकच नाहीत, तर जबाबदारी झटकणारे शाळा व्यवस्थापन आणि दुर्लक्ष करणारे पालकही या साखळीत तितकेच दोषी ठरतात. शाळांनी व्हॅन चालकांची पात्रता तपासावी, तर पालकांनीही आपल्या मुलांच्या वाहनांची सुरक्षा आणि वैधता पडताळून पाहणे गरजेचे आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार येत्या काळात आणखी व्यापक तपासणी मोहीम, जनजागृती उपक्रम आणि सुरक्षा नियमांविषयी मार्गदर्शन सत्र राबवले जाणार आहेत. ही कारवाई म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या लढाईतील पहिली निर्णायक पायरी असून, गोंधळलेल्या शाळा व बेफिकीर पालकांनी आता तरी जागे होणं गरजेचं आहे.