Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दक्षिण अरबी समुद्राच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, दि. १९ नोव्हेंबर: दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी तयार होत असून त्याचे २१ नोव्हेंबर रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळ, अंदमान, निकोबार परिसरात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.१९ नोव्हेंबरला दक्षिण अरबी समुद्राच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पश्चिम वायव्यच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळ, लक्ष्यद्वीप परिसरात १९ नोव्हेंबरला तसेच अंदमान, निकोबार बेटाच्या समुहात २० ते २२ नोव्हेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूत ईशान्य मॉन्सूनचा जोर २२ नोव्हेंबरनंतर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात मोठी वाढ दिसून येत आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ३६.२ अंश सेल्सिअस आणि सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १७.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.राज्यात १९ व २० नोव्हेंबर रोजी अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १९ नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात १९ व २० नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच भंडारा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.