Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

साडेबारा हजार पोलिसांची पद भरती करणार – पोलीस भरती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि.१२ डिसेंबर : राज्यातील पोलीस दलात साडेबारा हजार पदांची भरती करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ५ हजार २९८ जागा भरल्या जाणार आहेत, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.  काटोल व कोंढाळी येथे आज त्यांच्याहस्ते पोलीस भरती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी गृहमंत्र्यांच्या पत्नी आरती देशमुख, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, सुभाष कोठे, सतीश रेवतकर, नरेश अडसरे आदी उपस्थित होते. कोंढाळी व काटोल येथे शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यासोबतच नरखेड, भारसिंगी आणि थडीपवनी या ठिकाणी भरतीपूर्व तयारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रियेची माहिती होईल.

पोलीस विभागात निवड होतांंना या शिबिराचा लाभ होईल. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत, याचा मुलींना लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शक्ती कायद्याचे प्रारुप तयार करण्यात आले असून, या कायद्याच्या माध्यमातून महिलांच्या संदर्भातील गंभीर गुन्ह्यासंदर्भासाठी दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील मुली – महिला सुरक्षित वावरतील, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.  मराठा लॉन्सर्स, विदर्भ युथ क्रीडा मंडळ व राजूज जिम, काटोल आणि कोंढाळी येथे साहस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर सुरु करण्यात आले आहे.कोंढाळी येथे 550 आणि काटोल येथे 610 अशी एकूण 1 हजार 160 जणांनी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केली असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.