त्या दोन टस्कर हत्तींचा धुमाकूळ! वृद्ध महिला गंभीर जखमी, वनविभागावर संतापाचा उद्रेक
आ. रामदास मसराम यांचा तत्पर हस्तक्षेप; पोलिसात गुन्हा दाखल, रुग्णालयात हलवले..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील मानापूर गावात दि,१० मे, शनिवार रोजी सकाळी सात वाजता दरम्यान थरकाप उडवणारी घटना घडली. जंगलातून भर वस्तीत दाखल होत आलेल्या दोन टस्कर हत्तींपैकी एका हत्तीने वृद्ध महिला इंदिरा सहारे (६७) यांच्यावर थेट हल्ला केला. सोंडेने फेकून दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वनविभागाच्या हलगर्जी कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हत्तींचा अचानक हल्ला, गावकऱ्यांत उडाली धांदल..
ही घटना शनिवारी सकाळी सातच्या दरम्यान घडली असून गावाजवळील जंगलातून दोन टस्कर हत्ती थेट मानापूर गावात शिरले. अचानक आलेल्या हत्तींच्या दर्शनाने नागरिकांची एकच धांदल उडाली. पळापळीच्या गोंधळात इंदिरा सहारे या वृद्ध महिला हत्तीच्या तावडीत येताच एका टस्करने त्यांना सोंडेने उचलून फेकलं आणि त्याच ठिकाणी गंभीर जखमी झाल्या.
आरोग्य यंत्रणेचा फज्जा उडाला..
जखमी महिलेला गावकऱ्यांनी तत्काळ देलनवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांनी केवळ थातूरमातूर उपचार करत पोलिस केस नोंदवण्यास टाळाटाळ केली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी महिलेला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या बेपर्वाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आमदारांचा हस्तक्षेप; रुग्णालयात हलवले..
घटनेची माहिती मिळताच आ.रामदास मसराम यांनी तातडीने मानापूर गावाला धाव घेतली. त्यांनी जखमी वृद्ध महिलेची भेट घेत तिच्या प्रकृतीबाबत माहिती विचारपूस करून घेतली. परिस्थिती गंभीर असल्याने त्यांनी तातडीने आदेश देत महिलेला ग्रामीण रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच वनविभागाला हत्तीविरोधात वनगुन्हा दाखल करण्याचे निर्देशही दिले.
हत्तीचा बंदोबस्त करा, नागरिकांची मागणी..
गेल्या काही दिवसांपासून मानापूर व देलनवाडी परिसरात हत्तींचा मुक्त संचार सुरू असून वनविभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. परिणामी, अखेर ही दुर्घटना घडल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. यापुढे अशी घटना होऊ नये यासाठी हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
घटनास्थळी जनप्रतिनिधींची उपस्थिती..
या घटनेनंतर मानापूर गावात जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम, सरपंच मयुरी पेन्दाम, माजी सरपंच रामभाऊ हस्तक, वनविभाग अधिकारी, पोलीस आणि स्थानिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवत गावात सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली..
Comments are closed.