अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राचा आधारवड कोसळला : धर्मरावबाबा आत्राम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच त्यांचे निकटवर्तीय आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या भावना व्यक्त करताना ते अत्यंत भावूक झाले.
‘अजितदादांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला मोठा धक्का बसला आहे. आज मी माझा नेता नाही, तर माझा मोठा भाऊ आणि आधारवड गमावला आहे. अजितदादा हे केवळ एक कणखर राजकारणी नव्हते, तर ते माझ्यासारख्या आदिवासी भागातील कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मार्गदर्शक होते.
गडचिरोली जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि येथे रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी दादांनी नेहमीच झुकते माप दिले. जिल्ह्याला औद्योगिकदृष्ट्या प्रगत बनवण्याचे त्यांचे स्वप्न आता आम्हाला पूर्ण करायचे आहे. राज्याच्या राजकारणातील एक धाडसी, स्पष्टवक्ता आणि वेळेचा अत्यंत पक्का असलेला जननेता आज आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून काढता येणार नाही.’ मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
