Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कट्टर विदर्भवादी नेते: स्व.राजे विश्वेश्वरराव महाराज

Get real time updates directly on you device, subscribe now.

अहेरी इस्टेटचे राजे स्व. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांची आज पुण्यतिथी असून पुण्यस्मरणार्थ स्व. महाराजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुण्यस्मरणार्थ✍️✍️जयश्री खोंडे, अहेरी

    स्व. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत नागपूर राजधानीसह वेगळा व स्वतंत्र विदर्भ राज्य पाहिजे यासाठी एकाकी लढा दिला. वेगळ्या विदर्भाशिवाय विदर्भाचा विकास होऊच शकत नाही. हे हेरूनच प्रथमतः स्व. महाराजांनी १९५३ साली नाग विदर्भ आंदोलन समितीची स्थापना केली. नाग विदर्भ आंदोलन समितीच्या बॅनरखाली एकदा लोकसभेत तर तब्बल चारदा राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधित्व करून विदर्भाचा आवाज बुलंद केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

     या भागाचा विकास व अनुशेष दूर करायचे असल्यास वेगळा विदर्भ ही काळाची गरज आहे. सत्ता कोणाचीही असो विदर्भाचा विकास थांबलाच आहे, त्यातल्या त्यात पूर्व विदर्भ तर आजही विकासापासून कोसो दूर आहे. अविकसित व मागासलेपणा दूर करायचे असल्यास वेगळा व स्वतंत्र विदर्भ हाच त्यावरील जालीम उपाय आहे. आणि हे लक्षात घेऊनच न डगमगता, न घाबरता स्व. राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी आपले अख्खे आयुष्य विदर्भासाठी खर्चिक केले.

स्व. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी विदर्भाची ज्योत खास करून अहेरी राजनगरीतून पेटविली असता गडचिरीली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आदी व अन्य जिल्ह्यातही वणवा पेटला. त्यामुळे अन्य नेतेमंडळीही विदर्भाच्या रास्त मागणीसाठी स्व.राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्यासोबत जुळले पण ते कायमस्वरूपी टिकू शकले नाही. स्व. महाराजांनी असंख्य समर्थकांसोबत १९९५ साली नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चक्क पायदळ मोर्चा काढून अचंबित व राज्याचे लक्ष वेधून घेतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

     अन्य राजकीय नेतेमंडळी साथ सोडले म्हणून स्व. महाराज यत्किंचितही डगमगले नाही एकाकी लढा देत राहिले, विदर्भाची आजची परिस्थिती बघितली तर आपसुकच विदर्भवीर व अहेरी इस्टेटचे राजे स्व. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांची आवर्जून आठवण येते.

     स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यासोबतच स्व.  महाराज यांनी पिताश्री राजे धर्मराव महाराज यांच्या नावाने सन १९५८ साली राजे धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना केली. आज जिल्ह्यातील व प्रामुख्याने अहेरी उपविभागातील असंख्य मुले-मुली शिक्षण व पदव्या घेऊन शासकीय अधिकारी, कर्मचारी व अन्य विविध क्षेत्रात कार्यरत असून आजही राजे धर्मराव शिक्षण संस्थेत  विद्यादानाचे पावित्र्य कार्य अविरत व अखंडीतपणे सुरूच आहे. शिक्षण महर्षी म्हणून स्व. महाराजांची ख्याती बनली आहे. 

     स्व. राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला, पर्यावरण क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून देशात व किंबहुना राज्यात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज अहेरी इस्टेटचे राजे कैलासवासी श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांची २४ वी पुण्यतिथी असून स्व. महाराजांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.