वांग्याची भाजी न केल्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लातूर : वांग्याची भाजी का केली नाही म्हणून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. पीडित महिलेवर उदगीर येथे उपचार सुरु आहेत. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील हेर या गावात धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कौंंटुबिक वादातुन महिलेस जीवंत जाळण्याचा प्रयास झाला आहे. फरजाना शादुल शेख असे पीडित महिलेचे नाव आहे. ही महिला नवरा शादुल शेख याच्या त्रासास कंटाळून गेली आहे. हा दारूच्या व्यसनापायी वाया गेला आहे. सकाळी पत्नीबरोबर भांडण करून तो घराबाहेर गेला होता. रात्री घरी आल्यानंतर त्याने दारूच्या नशेत फरजानाला मारहाण करायला सुरुवात केली. वांग्याची भाजी का केली नाही असं विचारत त्यानं तिला बेदम मारहाण केली. घरातील रॉकेल फरजानाच्या अंगावर टाकून तिला पेटवून देण्याचाही प्रयत्न केला.
या घटनेत फरजाना मोठ्या प्रमाणात जखमी झाली आहे. उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात फरजानावर उपचार सुरू आहेत. याबाबत फरजानाच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भांडणात शेजाऱ्यांनी मध्यस्थी केल्या कारणानं फरजानाचा जीव वाचला आहे.
काही वर्षापूर्वी यांचा विवाह झाला आहे. मात्र, दारूचे व्यसन असल्यामुळे शादुल कोणतेही काम करत नव्हता. त्यातच त्याचे विवाहबाह्य संबध होते. ते उघड झाल्यामुळे फरजाना आणि त्यांच्यात सतत वाद होता. शादुल सतत किरकोळ कारणामुळे त्रास देतच होता. वांग्याची भाजी का केली नाही म्हणत त्याने शनिवारी मारहाण केली. चुलीजवळ असलेल्या रॉकेलच्या डब्यातील रॉकेल फरजानाच्या अंगावर टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. भांडणाचा आवाज ऐकून शेजारी आले. त्यांनी जळत असणाऱ्या फरजानास वाचवले. तिला तात्काळ उदगीरला उपचारसाठी हलविण्यात आले. त्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे देखील वाचा :
12 दिवसात तब्बल 2 रुपयांनी महागलं इंधन, अनेक शहरात पेट्रोलचे दर 105
12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवाड यांची महत्त्वाची माहिती
मनुष्यवस्तीत शिरला मध्यरात्री बिबट्या; बिबट्या CCTV कॅमेऱ्यात कैद
Comments are closed.