पावसाच्या तोंडावर हजारो क्विंटल धान अडकले; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा
आरमोरी–वैरागडमध्ये तातडीने केंद्रे सुरू करा; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलनाचा इशारा; सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडामयांचा प्रशासनाला इशारा...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी–वैरागड परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात कष्टाने पिकविलेल्या धानाच्या विक्रीचा प्रश्न गंभीर बनला असून, शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तातडीने आरमोरी आणि वैरागड येथे धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात यावीत, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दिला आहे.
उन्हाळी हंगामात मोठ्या अपेक्षेने धान उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना आज खरेदी केंद्राअभावी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन पावसाळ्याची चाहूल लागली असतानाही मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत आरमोरी व वैरागड येथील आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली नाहीत. संपूर्ण तालुक्यात केवळ वडधा येथेच खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, वैरागड व परिसरातील शेतकऱ्यांना धान वाहतुकीसाठी सहा ते सात हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.
हा खर्च परवडणारा नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान घरातच पडून आहे. पावसाळा सुरू झाल्याने धान भिजून खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धान विकण्याची वेळ ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या मते, आरमोरी आणि वैरागड येथे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली. मात्र, प्रशासनाकडून गोदाम उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. गोदामाची व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून आधारभूत किंमत योजना सुरू केली; मात्र संबंधित यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे या योजनेचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. धान खरेदी प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे हजारो क्विंटल धान अडकून पडले असून शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, “शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रश्नांबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. वेळेत नियोजन झाले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. आता दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊन आरमोरी व वैरागड येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल.”
यावेळी व्ही. डी. बावनकर, हेमराज प्रधान, राजकुमार नदरधने, विशाल काबई, मोहन धनकर, नकुल सोनबावणे, सुनील कुमरे, राजू मेत्राम, प्रितम मेत्राम, विजय मेत्राम, फरीज तागडे, शरद बावनकर, विशाल राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

