देऊळगाव परिसरात वाघाचा उच्छाद; संतप्त नागरिकांचा चक्का जाम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी, ता. — आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरात गेल्या वीस दिवसांत वाघाच्या हल्ल्यांत तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या हल्ल्यांनंतरही ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप करत नागरिकांनी सोमवारी देऊळगाव येथे भव्य चक्का जाम आंदोलन छेडले.
या आंदोलनाला आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमोल मारकवार, काँग्रेस नेते मिलिंद खोब्रागडे, धनपाल मिसार, सागर वाढई, प्रहार संघटनेचे निखिल धार्मिक, आजाद समाज पार्टीचे धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, सोनाशी लभाने यांसह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग असून तब्बल दोन तास वाहतूक ठप्प राहिली.

घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांनी घोषणाबाजी करत वन विभाग व प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी केली. दरम्यान, वन विभाग, तहसील कार्यालय आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
चर्चेनंतर नागरिकांच्या मागण्यांना मान्यता देण्यात आली. विशेषतः धोकादायक ठरलेल्या वाघाला येत्या १० तारखेपर्यंत पकडून पिंजऱ्यात ठेवण्याचे आश्वासन वन विभागाने दिले. आश्वासनानंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले.
वाघाच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली भीती आणि प्रशासनावरील नाराजी या घटनेतून प्रकर्षाने समोर आली असून वन विभागाच्या पुढील कारवाईकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

