Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२१४ शहिदांच्या कुटुंबीयांसाठी पोलिसांची ‘आपुलकीची बैठक’

अडचणी ऐकून घेतल्या; शिक्षण, आर्थिक मदत आणि शासकीय योजनांबाबत तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन.

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २ : माओवादविरोधी लढ्यात कर्तव्य बजावताना प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी बुधवारी विशेष संवाद बैठक घेतली. शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी थेट संवाद साधत त्यांच्या कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न जाणून घेण्यात आले. एकलव्य सभागृह, पोलीस मुख्यालय येथे झालेल्या या बैठकीत कुटुंबीयांनी मांडलेल्या समस्यांची नोंद घेऊन संबंधित विभागांमार्फत त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले.

गडचिरोलीच्या माओवादविरोधी अभियानात आतापर्यंत सुरक्षा दलाचे २१४ जवान शहीद झाले आहेत. प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावताना या जवानांनी दिलेल्या बलिदानामुळे जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या लढ्याला मोठे बळ मिळाले. या बलिदानाचे स्मरण ठेवतानाच शहीद कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न गडचिरोली पोलीस दलाकडून सातत्याने केला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याच भावनेतून पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या उपस्थितीत ही संवाद बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीदरम्यान शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या सध्याच्या अडचणी आणि आवश्यकतांची माहिती घेण्यात आली. विशेषतः कुटुंबातील मुलांचे शिक्षण, आर्थिक बाबी, कौटुंबिक प्रश्न तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली.

कुटुंबीयांनी मांडलेल्या प्रश्नांची केवळ नोंद न घेता त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. काही प्रकरणांमध्ये उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्याची ग्वाहीही देण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

‘शहीद जवानांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये, यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील,’ असा विश्वास अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, शहीद कुटुंबीयांसोबत नियमित संवाद ठेवून त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या उपक्रमाला या बैठकीमुळे अधिक संस्थात्मक स्वरूप मिळाले आहे. जवानांच्या बलिदानाची आठवण केवळ स्मृतिदिनापुरती मर्यादित न ठेवता त्यांच्या कुटुंबीयांच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजांमध्ये पोलीस दलाने सहभागी होण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला.

बैठकीस संबंधित मंत्रालयीन कर्मचारी तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.