Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्मार्ट’ मीटर, वाढते बिल अन् दुर्गम ग्राहकांची कोंडी; अहेरीत महावितरण विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

पाच तालुक्यांत मीटर बसविण्यास विरोध; ‘जुने मीटर, नियमित रीडिंग अन् योग्य बिल’ची मागणी — सात दिवसांत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा....

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी : स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज ग्राहकांच्या अडचणी वाढत असल्याचा आरोप करीत अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने महावितरणविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाच तालुक्यांत स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी, तसेच जुन्या मीटरचे नियमित रीडिंग घेऊन त्याच आधारे वीज बिल आकारावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीवर सात दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या आलापल्ली येथील कार्यकारी अभियंत्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. स्मार्ट मीटरचा निर्णय घेण्यापूर्वी दुर्गम भागातील प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करण्यात आला आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

अहेरी विधानसभा क्षेत्राचा मोठा भाग दुर्गम आणि जंगलव्याप्त आहे. अनेक गावांमध्ये अद्याप मोबाईल नेटवर्कची सुविधा पुरेशी उपलब्ध नसताना ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरणे, स्मार्ट मीटरशी संबंधित डिजिटल प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणींचा सामना सर्वसामान्य ग्राहकांनी कसा करायचा? असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विशेष म्हणजे, याच प्रश्नावर आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी ३१ मार्च २०२६ रोजी पत्राद्वारे भूमिका मांडली होती. मात्र त्यानंतरही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवती काँग्रेसने महावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

स्मार्ट मीटर नको, आधी ग्राहकांचा विश्वास जिंका, अशी भूमिका घेत जुन्या मीटरचे नियमित रीडिंग, पारदर्शक बिलिंग आणि ग्राहकांना सहज उपलब्ध होणारी तक्रार निवारण व्यवस्था यावर भर देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सात दिवसांच्या मुदतीत स्मार्ट मीटर बसविण्याबाबत आणि जुन्या मीटरच्या नियमित रीडिंगबाबत ठोस निर्णय न झाल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

आता महावितरण प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन अहेरी विधानसभा क्षेत्रातील ग्राहकांच्या मागणीवर काय निर्णय घेते, की आंदोलनानंतरच प्रशासन जागे होणार?, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.