बंदुका थांबल्या; आता विकासाची बीजे रुजणार!
गडचिरोलीतील पुनर्वसन झालेल्या १०० नागरिकांचा बेंगळुरूच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’कडे प्रवास; शेती, सिंचन आणि रोजगारातून नव्या विकासपर्वाची सुरुवात...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कधीकाळी हिंसाचार आणि बंदुकीच्या सावटाखाली राहिलेल्या गडचिरोलीत आता विकास, पुनर्वसन आणि सामाजिक परिवर्तनाची नवी वाट निर्माण होत आहे. मुख्य प्रवाहात परतलेल्या सुमारे १०० पुनर्वसन झालेल्या नागरिकांचा विशेष गट गुरुवारी बेंगळुरू येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आश्रमाकडे रवाना झाला. संघर्षातून शांततेकडे आणि बंदुकीपासून विकासाच्या दिशेने झालेल्या या प्रवासाला या उपक्रमामुळे नवे परिमाण मिळाले आहे.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन आणि गडचिरोली पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गडचिरोली पोलीस परिसरात झालेल्या फ्लॅग-ऑफ सोहळ्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी, लॉयड्स मेटल्स तसेच लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिपचे अधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते भूपती उर्फ सोनू उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल यांची उपस्थिती. एकेकाळी देशातील प्रमुख नक्षलवादी नेत्यांमध्ये गणना झालेल्या भूपती यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाह स्वीकारला आहे. नुकतीच त्यांची गोंडवाना विद्यापीठात ‘ग्रामसभा समन्वयक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या विशेष गटाचे नेतृत्व असिन राजाराम उर्फ अनिल करीत आहेत. त्यांनीही मुख्य प्रवाहात परतल्यानंतर नव्याने जीवनाला सुरुवात केली असून, गेल्या जवळपास दोन वर्षांपासून ते लॉयड्ससोबत कार्यरत आहेत.
यावेळी सहकाऱ्यांना संबोधित करताना सोनू यांनी “विविध संस्था आमच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. आम्हालाही मुख्य प्रवाहात परतून लोकांमध्ये काम करत त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी योगदान देत राहायचे आहे,” अशी भावना व्यक्त केली.
८०० हून अधिक नागरिकांनी सोडला हिंसाचाराचा मार्ग…
गडचिरोलीत २००५ ते २०२६ या कालावधीत ८०० हून अधिक नागरिकांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात पुनरागमन केले आहे. मात्र, केवळ आत्मसमर्पण किंवा पुनर्वसन करून प्रक्रिया पूर्ण होत नाही; या नागरिकांना सन्मानजनक रोजगार, सामाजिक स्वीकार आणि स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान राहिले आहे. याच आव्हानाला संधीत रूप देत गडचिरोली पोलीस प्रशासन आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या पुढाकारातून शेकडो पुनर्वसन झालेल्या नागरिकांना लॉयड्स मेटल्समध्ये कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आता गावागावांत शेती-सिंचनाचा नवा प्रयोग…
पुनर्वसनाच्या पुढील टप्प्यात केवळ रोजगार नव्हे, तर गावांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, लॉयड्स मेटल्स आणि गडचिरोली पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त सहकार्याने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये विशेष शेती आणि सिंचन प्रकल्प राबविण्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे.
यामध्ये सेंद्रिय शेती, बहुपीक पद्धती आणि सौरऊर्जेवर आधारित सिंचन व्यवस्था यांसारख्या आधुनिक व शाश्वत कृषी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. पुनर्वसन झालेल्या नागरिकांच्या सहभागातून गावांची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.या उपक्रमासाठी लॉयड्स मेटल्स आणि गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
‘गडचिरोली फर्स्ट’चा विकासाचा दृष्टिकोन…
लॉयड्स मेटल्सचा हा उपक्रम केवळ औद्योगिक किंवा आर्थिक प्रकल्पापुरता मर्यादित न राहता स्थानिक विकासाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या पर्यायी कॉर्पोरेट मॉडेलच्या दिशेने वाटचाल ठरत आहे.कंपनीने ‘गडचिरोली फर्स्ट’ हा दृष्टिकोन स्वीकारत स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि कौशल्य विकासावर भर दिला आहे. त्यासाठी स्किल अकादमीची स्थापना करण्यात येत असून, त्यातून हजारो युवकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. स्थानिक नागरिक आणि आदिवासी समाजातील सदस्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नातून उद्योग आणि स्थानिक समाज यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शांततेपासून स्वावलंबनाकडे; नव्या गडचिरोलीचा रोडमॅप…
गडचिरोली पोलीस प्रशासनाचे आयजी संदीप पाटील, पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पुढे नेला जात आहे.‘आर्ट ऑफ लिव्हिंग’सोबतच्या सहकार्याच्या माध्यमातून गडचिरोलीच्या सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक विकासासाठी दीर्घकालीन रोडमॅप तयार करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत.एकेकाळी हातात बंदूक घेऊन जंगलात संघर्ष करणारे नागरिक आता शेती, सिंचन, रोजगार आणि ग्रामविकासाच्या माध्यमातून समाजाच्या आर्थिक उन्नतीत सहभागी होणार आहेत, ही या उपक्रमाची सर्वात महत्त्वाची बाजू आहे.
त्यामुळे बेंगळुरूकडे रवाना झालेला हा १०० नागरिकांचा समूह केवळ एका आश्रमाच्या भेटीसाठी निघालेला प्रवास नाही; हिंसाचारातून शांततेकडे, पुनर्वसनातून स्वावलंबनाकडे आणि संघर्षातून विकासाकडे गडचिरोलीच्या बदलत्या प्रवासाचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रशासन, उद्योगजगत, आध्यात्मिक संस्था आणि पुनर्वसन झालेले माजी नक्षलवादी कॅडर विकासाच्या समान ध्येयासाठी एका व्यासपीठावर येणे, ही गडचिरोलीच्या बदलत्या चित्राची ठळक नांदी ठरत आहे.

