Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चामोर्शीत अज्ञात तरुणाचा निर्घृण खून

वाघोली शिवारात डोक्यात धारदार हत्याराने वार; मृताची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चामोर्शी, दि. ८ : तालुक्यातील वाघोली शिवारात अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा डोक्यात धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. चामोर्शी-मुल मार्गालगत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मृत तरुणाची ओळख पटविण्यासह हत्येचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चामोर्शी-मुल मार्गापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर असलेल्या वाघोली शिवारात सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. अज्ञात व्यक्तीने तरुणाच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार केले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला. मृत तरुणाकडे ओळख पटविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा अन्य ठोस माहिती आढळून न आल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी मृताचे वर्णन जाहीर करून त्याच्या नातेवाइकांचा किंवा परिचितांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.

मृत तरुणाची उंची सुमारे साडेपाच फूट असून, रंग गोरा आणि शरीरयष्टी सडपातळ आहे. त्याच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट आणि खाकी रंगाची पॅन्ट होती. गळ्यात चांदीची चैन, डाव्या हातात काळ्या रंगाचे घड्याळ आणि पायात पॅरागॉन कंपनीच्या प्लास्टिक चपला होत्या. या वर्णनाशी साधर्म्य असलेली व्यक्ती परिसरातून बेपत्ता असल्यास किंवा मृत तरुणाबाबत कोणतीही माहिती असल्यास चामोर्शी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, या तरुणाची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा उलगडा झालेला नाही. वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य अथवा अन्य कोणत्या कारणातून हा खून करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून विविध अंगांनी सुरू आहे. हत्येमागील कारण, आरोपींची संख्या, वापरण्यात आलेले हत्यार तसेच मृत तरुणाला घटनास्थळी आणण्यात आले होते की त्याच्यावर तेथेच हल्ला करण्यात आला, याबाबतही तपास सुरू आहे.

हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील संभाव्य पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे. चामोर्शी-मुल मार्गावरील तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, संशयित व्यक्ती किंवा वाहनांबाबत काही धागेदोरे मिळतात का, याचा शोध घेतला जात आहे. तांत्रिक तपासाच्या आधारेही पोलिसांकडून माहिती संकलित केली जात आहे.

अज्ञात तरुणाची ओळख पटविणे आणि हत्येचा उलगडा करणे या दोन्ही बाबींना पोलिसांनी प्राधान्य दिले असून, तपासातून हत्येमागील कारण आणि आरोपींची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाघोली शिवारात घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.