सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न महिनाभरात सोडवा; राज्य सफाई कर्मचारी आयोगाचा प्रशासनाला सज्जड दम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: शहराच्या आरोग्यासाठी राबणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांकडे होणारे दुर्लक्ष आता खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड इशारा देत राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी जिल्हा प्रशासनाची कानउघाडणी केली. वेतन, पदोन्नती, वारसा हक्क आणि निवासाशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्न येत्या ३० दिवसांत निकाली काढण्याचे थेट निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्यमंत्र्यांचे सचिव अनिरुद्ध पालकर यांच्यासह सर्व पालिकांचे मुख्याधिकारी आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सफाई कामगारांना दर महिन्याच्या १ ते ५ तारखेदरम्यान वेळेत वेतन मिळालेच पाहिजे, असे ठणकावून सांगत डागोर यांनी वेतन खात्याशी संलग्न असलेले १ कोटींचे अपघाती विमा कवच आणि ५ लाखांची कॅशलेस उपचार सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार वारसा हक्क आणि अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरणांवर गडचिरोली व देसाईगंज नगरपरिषदेने महिनाभरात अंतिम निर्णय घ्यावा, अशा सूचना आयोगाने दिल्या. तसेच २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या व निवृत्त कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देण्यासाठी जागा निश्चित करून नगरविकास विभागाकडे त्वरित प्रस्ताव पाठवण्यास सांगण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची जुनी घरे तोडण्यापूर्वी त्यांची पर्यायी निवासाची व्यवस्था करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आयोगाच्या सर्व निर्देशांची नोंद घेत सर्व विभागप्रमुखांना कालबद्ध अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

