उपचारास होणारा प्रारंभिक विलंब ठरतोय जीवघेणा; मातामृत्यू रोखण्यासाठी वेळेवर नोंदणीचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: अंधश्रद्धा, सामाजिक संकोच अथवा कौटुंबिक अडचणींमुळे गरोदरपणात उपचारासाठी होणारा प्राथमिक विलंब थेट माता आणि बालकांच्या जीवावर बेतत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. निष्पाप जिवांचे रक्षण करायचे असेल, तर गरोदरपणाची चाहूल लागताच पहिल्या तिमाहीत आरोग्य केंद्रात नोंदणी करून नियमित तपासण्या करणे अनिवार्य असल्याचे कळकळीचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे. दरम्यान, हेडरी (ता. एटापल्ली) येथील कालीअम्मल रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीच्या प्रसंगी तातडीने रक्तपुरवठा व यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी माता आणि नवजात बालिकेला जीवदान दिले आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागातून जिल्हा रुग्णालय तसेच महिला व बाल रुग्णालयाकडे संदर्भित (Refer) होणाऱ्या गंभीर रुग्णांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत थेट दुप्पट झाले आहे. यंदा तब्बल सहा हजार अतिजोखमीच्या गर्भवती माता व आजारी नवजात बालके उपचारासाठी दाखल झाली. तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असतानाही वैद्यकीय यंत्रणा २४ तास कार्यरत राहून युद्धपातळीवर सेवा देत आहे. मात्र, प्राथमिक पातळीवर दुर्लक्ष करून रुग्ण अगदी अंतिम टप्प्यात रुग्णालयात येत असल्याने उपचारांना मर्यादा येत आहेत.
नुकतीच मुरुमगाव परिसरातील दिव्या रामसिंग उसेंडी (वय ३१) या मातेचा झालेला मृत्यू अशाच निष्काळजीपणाचा बळी ठरला. या महिलेची गर्भधारणेदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित नोंदणी (ANC), वेळेवर तपासणी अथवा संस्थात्मक प्रसूतीचे नियोजन झाले नव्हते. परिणामी, जेव्हा तिला रुग्णालयात आणले गेले, तेव्हा ती अत्यंत गंभीर व शेवटच्या घटका मोजत (गॅस्पिंग) होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अल्पावधीतच तिचे प्राण गेले, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांनी दिली.
रक्ताची तीव्र कमतरता, उच्च रक्तदाब व संसर्ग यांसारख्या धोक्यांचे वेळेत निदान झाल्यास मातामृत्यू सहज टाळता येतात. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव तपासण्या टाळू नयेत; पहिल्या तीन महिन्यांत आशा सेविका किंवा जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात नोंदणी करून सुरक्षित प्रसूतीचा मार्ग निवडावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

