Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुर्गम भागातील शाळा बंद होण्याच्या संकटावर मात; भाकपच्या आक्रमक पाठपुराव्याने कोसा आलेंगाची प्राथमिक शाळा अखेर पुन्हा सुरू

इमारत असूनही शिक्षक नसल्याने चिमुरड्यांचा जंगलातून २-३ किमी खडतर प्रवास; भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जनआंदोलनाला मोठे यश, विद्यार्थ्यांना गावातच शिक्षणाची कवाडे खुली...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

एटापल्ली(गडचिरोली) :

राज्यात एकीकडे पटसंख्येच्या नावाखाली ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना, दुसरीकडे एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कोहका ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या कोसा ,आलेंगा येथील बंद पडलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुन्हा गजबजली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), अखिल भारतीय युवक महासंघ (एआयवायएफ) आणि अखिल भारतीय विद्यार्थी महासंघ (एआयएसएफ) यांच्या सातत्यपूर्ण व आक्रमक पाठपुराव्यामुळे प्रशासनाला अखेर शिक्षक नियुक्त करणे भाग पडले असून, हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्काचा आणि लोकशाही मार्गाने उभारलेल्या लढ्याचा मोठा विजय मानला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिक्षकाविना कुलूपबंद शाळा; चिमुरड्यांची जंगलातून जीवघेणी पायपीट…

कोसा, आलेंगा गावात जिल्हा परिषद शाळेची पक्की इमारत आणि शिकण्याची जिद्द असलेली मुले उपलब्ध असतानाही, केवळ शिक्षक नसल्यामुळे अनेक वर्षांपासून या शाळेच्या दरवाजाला कुलूप लागले होते. परिणामी, प्राथमिक शिक्षणासाठी गावातील लहान विद्यार्थ्यांना शेजारच्या कोहका येथील जिल्हा परिषद शाळेत जावे लागत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दररोज दाट जंगलातील २ ते ३ किलोमीटरच्या निसरड्या व खडतर पायवाटेने चिमुरड्यांना पायी प्रवास करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात जंगली श्वापदे, ओढे-नाले आणि घनदाट जंगलातून होणारी ही ये-जा लहान मुलांच्या जिवावर बेतणारी ठरत होती. ही गंभीर वस्तुस्थिती आणि मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पालकांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिला.

प्रशासकीय उदासीनतेवर भाकपचा प्रहार; अखेर शिक्षक नियुक्त…

घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय युवक महासंघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी महासंघ यांनी थेट शिक्षण प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. तातडीने शिक्षक रुजू करून शाळा नियमित सुरू करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला गेला. संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाला झुकावे लागले आणि कोसा ,आलेंगा शाळेसाठी तात्काळ शिक्षक उपलब्ध करून शाळा पूर्ववत सुरू करण्यात आली.

“शाळा बंद पडण्याच्या काळात शाळा सुरू करणे ही जनआंदोलनाची ताकद!”…

शाळा सुरू झाल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितले – “शाळांची इमारत धूळ खात पडून राहणे आणि शिक्षक नसल्याने लहान मुलांना शिक्षणासाठी जंगलातून पायपीट करावी लागणे ही व्यवस्थात्मक शोकांतिका होती. आज शासनस्तरावर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर असताना, एका दुर्गम-आदिवासी भागातील बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू करून दाखवणे, ही जनआंदोलनाची खरी ताकद आहे. प्रत्येक पाड्यातील आणि खेड्यातील पाल्याला त्याच्याच गावात सुरक्षित व दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्याचा घटनादत्त अधिकार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आमचा लढा असाच सुरू राहील.”

गावात आनंदाचे वातावरण; लढ्याला सलाम…

अनेक वर्षांनंतर गावातच शाळेची घंटा वाजल्याने कोसा आलेंगा येथील पालक व ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. आपल्या पाल्यांचा जंगलातील जीवघेणा प्रवास थांबल्यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, गोरगरीब व आदिवासी जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे रस्त्यावर उतरणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांच्या विद्यार्थी-युवक संघटनांचे मनापासून आभार मानले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.