‘सेवा महोत्सवा’त गडचिरोलीकरांसाठी सांस्कृतिक पर्वणी; रविवारी रंगणार सुरांची मैफल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा महोत्सव–2026’ अंतर्गत रविवारी (दि. 26) गडचिरोलीत भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकारातून सायंकाळी 6 वाजता आरमोरी रोडवरील सुमानंद सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, नागरिकांसाठी प्रवेश पूर्णपणे नि:शुल्क ठेवण्यात आला आहे.
‘अजब गजब विचार मंच’ प्रस्तुत या सांस्कृतिक महोत्सवात संगीत, लोककला आणि सांस्कृतिक वारशाचा सुरेख मिलाफ अनुभवायला मिळणार आहे. पुण्याचे सुप्रसिद्ध गायक राजेश दातार आणि प्रज्ञा देशपांडे यांच्या सुरेल गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील नामवंत कलाकारांकडून गोंधळ, भारूड, कोळीगीत, जोगवा, धार्मिक व देशभक्तीपर गीत-नृत्य तसेच महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहेत.
लोककला, संगीत आणि सांस्कृतिक परंपरेचे वैभव एका व्यासपीठावर अनुभवण्याची संधी या महोत्सवातून मिळणार असून, गडचिरोलीकरांसाठी ही एक आगळीवेगळी सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असला तरी नियोजनाच्या दृष्टीने प्रवेश पासची व्यवस्था करण्यात आली आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील युवक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच कला आणि संस्कृतीची आवड असलेल्या सर्व नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले आहे.
दरम्यान, अजब गजब विचार मंचचे संस्थापक सतीश त्रिनगरीवार यांनीही नागरिकांनी प्रवेश पासेस घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि या सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे.


Comments are closed.