हम सुनते नहीं बनाते है कहानियॉं
तरुणाईची ऊर्जा..!
बाळू दत्तात्रय राठोड, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:-
युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आपण आज साजरा करतोय… स्वामीजींच्या चारित्र्यामधून, विचारांमधून नवसमाज निर्माण व्हावा, या उदात्त हेतूने स्वामीजींची जयंती संपूर्ण जगामध्ये युवक दिवस म्हणून साजरी केली जाते. आजच्या युवकांच्या आयुष्यात “मॉडर्नायझेशन’ला मोठे स्थान असल्याचे दिसते. वेळेनुरूसार परिवर्तन आवश्यक आहेच. मॉडर्नायझेशनही हवेच; पण पाश्चात्त्यांचे अंधानुकरण नको. आपण या समाजाशी, राष्ट्राशी किती प्रामाणिक आहोत, याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. तरुणांमध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे; फक्त गरज आहे ते योग्य मार्गदर्शनाची. आज अनेक तरुण समाजातील सकारात्मक कार्यासाठी पुढाकार घेत आहेत. तसेच सामाजिक कामात ते अग्रेसर असल्याचे दिसते. भारत हा जगातील सर्वांत मोठा युवकांचा देश आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त तरुण हे 25 च्या खालील वयोगटातील आहेत. भविष्यातील भारतीय अर्थव्यवस्थेवर या युवाशक्तीचा फार मोठा प्रभाव असणार आहे. तरुणाईच्या मनगटातील आणि मस्तकातील ताकदीशिवाय राज्य अथवा देशाची प्रगती होऊ शकत नाही, हे स्पष्ट आहे. तरुणांनी ठरवलं, तर ते समाजमन बदलू शकतात. आजचा तरुण सुशिक्षित, आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या अंगाने शिक्षित, विधायक कामावर भर देणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून सकारात्मक विचार करणारा आहे. योग्य दिशा गवसली की, तो मागे वळून बघणारा नाहीच. टीमवर्क व आपल्या मित्र-मैत्रिणींना सोबत घेऊन “कदम, कदम बढाए जा…’ या दिव्य विचारासह समोर जाण्याची ताकद त्याच्या मनगटात नक्कीच आहे. आजच्या युवकांचे वर्णन करताना प्रदीप कुमार नावाचा एक शायर म्हणतो,
जोश और उमंगे हैं हमारी निशानियॉं,
हम सुनते नहीं बनाते हैं कहानियॉं,
हम हैं आज के युवा, कुछ भी नहीं असंभव,
दिल में जुनून और रग-रग में हैं रवानियां…
विज्ञानाच्या व तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे असंख्य साधने तरुणाईच्या हातात आली आहेत. हे तंत्रज्ञान व्यक्तीच्या सुलभतेसाठी वापरण्यात गैर काहीही नाही; पण याच तंत्रज्ञानाचा आधार घेऊन समाजविघातक कृत्ये घडवून आणणारी माणसे या विज्ञानाच्या व तंत्रज्ञानाच्या जोरावर दहशतवादी हल्ले घडवून आणत आहेत. याचाही विचार एक कर्तव्यदक्ष युवक म्हणून आपल्याला करावा लागेल. या साधनांचा विवेकपूर्ण वापर करून समाजाला नवीन दिशा देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. ही मानवी जीवनाची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणायची असेल, तर स्वामी विवेकानंद व इतर अनेक महापुरुषांच्या विचारांकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे.
21 वे शतक हे भारताचे शतक! पंतप्रधानांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्व जण हेच म्हणताना दिसतात. पण, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणी काहीतरी करताना दिसतो का?
स्वातंत्र्यानंतर आयटी क्षेत्रातील भारताचे मागासलेपण कॉम्प्युटरच्या मदतीने दूर करण्याची किमया 20 ते 25 वर्षे वयोगटाच्या मुलांनी साधली. तेव्हा सगळ्या जगाचे पुन्हा एकदा डोळे भारताकडे वळले, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. अनेक क्षेत्रांत तरुणाई प्रगती करत असली तरी आजही अनेक तरुण भरकटलेले दिसतात. अशा तरुणांना मार्ग दाखविण्याचे काम यशस्वी झालेल्या तरुणांनी करायला हवे. तरुणांना सकारात्मक दिशा देण्यासाठी अनेक संघटना, संस्था व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. पुणे येथे भारतीय छात्र संसद दरवर्षी युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. अशा उपक्रमातून युवकांचे खरे नेतृत्व उदयास येतील. तीन वर्षाआधी मला या छात्र संसदेत सहभागी होता आले तेव्हा या युवकांच्या प्रतिनिधी संसदेतील अभिनेता नाना पाटेकर यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. या छात्र संसदेतून नाना पाटेकर यांनी आपल्या शब्दांमधून युवकांना खऱ्या अर्थाने दिव्य संदेश दिला.
ते म्हणतात…
काय चाललंय आपल्या आजूबाजूला?
काय घडतंय? जे काही घडतंय त्याने अस्वस्थतेशिवाय दुसरं काय येणार?
तुम्हीही अस्वस्थ असालच. त्यासाठी रस्त्यावर जरूर उतरा; पण भारतीय म्हणूनच!
जात, धर्म घेऊन रस्त्यावर उतरणार असाल, तर तुमची अजिबात गरज नाही,
माझ्या देशातल्या शेतकऱ्याने आत्महत्या करू नये,
तरुणांनी निराशेने नक्षलवादाकडे वळू नये, ही परिस्थिती फक्त तुम्ही… तरुणचं बदलू शकता..!
बाळू दत्तात्रय राठोड नागपूर, मो. 9881323543
Comments are closed.