Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा १३ जुलैला गडचिरोलीत जिल्हास्तरीय मोर्चा

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेतील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशन (AIFAWH)च्या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यात १३ जुलै २०२६ रोजी जिल्हास्तरीय भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे.

ICDS योजनेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असतानाही अंगणवाडी सेविका व मदतनीसांना नियमित सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान वेतन, पेन्शन, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी (PF) यांसारखे मूलभूत हक्क अद्यापही मिळालेले नाहीत. तसेच २०१८ नंतर केंद्र सरकारकडून मानधनात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याची नाराजी संघटनेने व्यक्त केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याशिवाय FRS, ई-केवायसी, पोषण ट्रॅकर, BLO, जनगणना, विविध सर्वेक्षणे तसेच योजनेबाहेरील वाढीव कामांचा बोजा अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर टाकण्यात येत असून, या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे मूळ सेवाकार्यात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

या आंदोलनातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, किमान वेतनाची अंमलबजावणी, पेन्शन, ग्रॅच्युइटी व PF योजना लागू करणे, ICDS ला स्वतंत्र विभागाचा दर्जा देणे, BLO ची सक्तीची कामे बंद करणे, पर्यवेक्षिका पदासाठी १०० टक्के भरती अंगणवाडी सेविकांमधून करणे, ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत प्रलंबित मानधन तातडीने अदा करणे तसेच सर्व अंगणवाड्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या जिल्हास्तरीय आंदोलनाचे नेतृत्व कॉ. रमेशचंद्र दहिवडे, कॉ. अमोल मारकवार यांच्यासह छाया कागदेलवार, विटाबाई भट, सुनंदा बावणे, बबीता मडावी, मोनिका विस्वास, सुमन तोकलवार, माया शेडमाके, कुसुम नैताम, माया नैनुरवार, कविता कातकर, कविता सिडाम, करुणा दुर्वा, उज्वला उंदिरवाडे, योगिता मुनघाटे आणि जयश्री शेरेकर हे करणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन अंगणवाडी कर्मचारी संघटना (सिटू), गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.