Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कन्हारटोला येथे फळबाग लागवडीचा अभिनव उपक्रम

हेल्पिंग हॅण्ड बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार; शेतातच प्रात्यक्षिकातून शास्त्रीय लागवडीचे धडे...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धानोरा :ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवडीचा पर्याय उपलब्ध करून देत त्यातून भविष्यातील उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याच्या उद्देशाने हेल्पिंग हॅण्ड बहुउद्देशीय संस्था, धानोरा यांच्या वतीने कन्हारटोला येथे फळबाग लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. प्रभाकर मंडावार यांच्या शेतजमिनीत आंबा, डाळिंब, फणस यांसह विविध फळझाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

फळबाग लागवड केवळ रोपे लावण्यापुरती मर्यादित न राहता ती शास्त्रीय पद्धतीने आणि योग्य नियोजनाने केली तर दीर्घकालीन उत्पन्नाचा आधार ठरू शकते, या उद्देशाने संस्थेने प्रत्यक्ष शेतात हा उपक्रम घेतला. यावेळी शेतकऱ्यांना योग्य फळपिकांची निवड, गुणवत्तापूर्ण रोपांची निवड, लागवडीपूर्वी जमिनीची तयारी, खड्ड्यांची योग्य पद्धतीने आखणी, झाडांमधील अंतर, खतांचा संतुलित वापर, पाणी व्यवस्थापन तसेच लागवडीनंतरची निगा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष म्हणजे, या सर्व बाबी केवळ माहितीच्या स्वरूपात न सांगता प्रत्यक्ष शेतात प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आल्या. त्यामुळे फळबाग लागवडीची शास्त्रीय पद्धत शेतकऱ्यांना कृतीतून समजून घेता आली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी पद्धती आत्मसात करून शेती अधिक उत्पादनक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

यावेळी हेल्पिंग हॅण्ड बहुउद्देशीय संस्था, धानोरा चे सचिव आशिष म्हशाखेत्री यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. युवा परिवर्तन संस्थेचे व्यवस्थापक प्रशांत मांडवार यांचीही विशेष उपस्थिती होती. त्यांनी फळबाग लागवडीचे नियोजन, झाडांची नियमित निगा आणि भविष्यातील उत्पन्नाच्या दृष्टीने फळबागेचे महत्त्व याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या उपक्रमात कन्हारटोला येथील तराबाई कुरुडकर, अजित हलामी, चिंटू कुमोटी आणि विनोद करंगामी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले. संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सामाजिक कार्यासोबत आता कृषी क्षेत्राकडेही वाटचाल..

हेल्पिंग हॅण्ड बहुउद्देशीय संस्था, धानोरा यांच्या वतीने यापूर्वी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि सामाजिक जनजागृतीच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. शाळा व आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, शैक्षणिक व रोजगारविषयक जनजागृती, स्वच्छता पंधरवडा आणि स्वच्छता जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धानोरा येथील विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धन, सामाजिक प्रश्न आणि जनजागृतीपर पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले. विविध संस्थांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी साडी वितरणासारखे सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले आहेत.

या सामाजिक उपक्रमांच्या मालिकेत आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन आणि फळबाग लागवडीस प्रोत्साहन देण्याचा उपक्रम जोडला गेला आहे. ‘शेतात फळझाडे, भविष्यात उत्पन्नाचा आधार’ या संकल्पनेतून फळबाग लागवडीला चालना देत शेतकऱ्यांना अधिक शाश्वत आणि विविधांगी उत्पन्नाच्या दिशेने मार्गदर्शन करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.