Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीत प्राणहीता नदीपात्रात हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त; पती-पत्नी अटकेत, विषारी दारूचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील प्राणहीता नदीपात्रात बेकायदेशीर गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर अहेरी पोलिसांनी छापा टाकून एक मोठी कारवाई केली. यावेळी पती-पत्नी दारू बनवताना रंगेहाथ पकडले गेले असून, ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने जिल्ह्यात हातभट्टीच्या विषारी दारूचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे अचूक धाड..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहेरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार वनिता गेडाम यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने ही कारवाई केली.

मौजा महागाव येथील प्राणहीता नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर रविवारी सकाळी पोलिसांनी अचानक धाड टाकली. यावेळी संतोष नागा गौरारप (३९) आणि साधना गौरारप (३५) हे दारू तयार करताना सापडले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुद्देमालात विषारी संडवा, भांडी आणि रसायनांचा समावेश..

जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये पुढील सामग्री होती:८०० लिटर गुळामोहाचा संडवा – ₹८०,०००, १० प्लॅस्टिक ड्रम्स, स्टील भांडी आणि काळा गूळ – ₹५,१०० ही गावठी दारू मोहाची फुले, झाडांची साल, नवसागर, तुरटी आदी रसायनांपासून बनवली जात असल्याचे स्पष्ट झाले असून, ती मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.

गुन्हा नोंद – पण लोक प्रश्न विचारतात : “दारूबंदी कायद्याचं काय?”

फिर्यादी पो.ह. मनोज शेंडे (११६५) यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक १३२/२०२५ नोंदवून, संबंधित पती-पत्नीविरोधात भादंवि कलम १२३ आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ब), (क), (ई), (फ), ८३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तालुक्यात अशा अवैध अड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दारूबंदी कायदा अस्तित्वात असला, तरी अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी कागदोपत्रीच मर्यादित असल्याचा अनुभव नागरिकांना येतो आहे.

आरोग्याचा गालबोट आणि व्यसनमुक्तीची लोपलेली दिशा..

या प्रकारच्या दारूमुळे यकृत निकामी होणे, मज्जासंस्थेचे विकार, मानसिक असंतुलन, आणि प्रसंगी मृत्यूसुद्धा घडण्याची उदाहरणं जिल्ह्यात आहेत. गावठी दारू ही केवळ कायद्याचा प्रश्न नसून, ती सामाजिक आणि आरोग्याशी निगडीत दीर्घकालीन संकट आहे.

आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाज कार्यकर्त्यांनी याबाबत एकत्रित कृती आराखडा उभा करण्याची गरज आता प्रकर्षाने जाणवत आहे.

केवळ अड्डेच नव्हे, तर साखळीही उद्ध्वस्त झाली पाहिजे…

या कारवाईचं स्वागत होत असलं, तरी यामागे असणारी वितरणसाखळी, पुरवठादार, दलाल, आणि मूक राजकीय समर्थनाची छाया नष्ट होईपर्यंत अशा कारवाया तोडग्याऐवजी ‘तात्पुरते डागणे’ ठरतील, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

कायद्याच्या पलिकडचं उत्तरदायित्व..

दारूबंदी कायदा केवळ दंडात्मक कारवाईसाठी नाही, तर व्यसनमुक्त समाज उभारण्याच्या व्यापक हेतूसाठी अस्तित्वात आहे.

पोलिस यंत्रणांच्या तत्परतेबद्दल शंका नाही, पण त्याचवेळी आरोग्य विभाग, समाजकल्याण संस्था आणि शिक्षण यंत्रणांनीही पुढाकार घेणं अपरिहार्य आहे.

या प्रकरणातून एक अड्डा बंद झाला, पण समाजात अशा किती अड्ड्यांची मुळे खोलवर पसरलेली आहेत, याची गंभीर जाणीव झाली पाहिजे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.