Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जंगलात बुद्ध पौर्णिमा! गुरुवडा नेचर सफारीत ‘निसर्ग अनुभव’ — वाघ, बिबट्याच्या सहवासात एक रात्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : शहराच्या आठ किलोमीटर अंतरावर जंगलाच्या कुशीत बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने एक थरारक आणि अविस्मरणीय रात्र अनुभवायला मिळणार आहे. गडचिरोली वनविभागाच्या वतीने १२ मे रोजी गुरुवडा नेचर सफारी येथे ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमांतर्गत रात्रभर चालणाऱ्या प्राणीगणनेचा आगळा प्रयोग होणार आहे. वाघ, बिबट्या, अस्वल यांच्यासोबत जंगलात रात्र काढण्याचा योग निसर्गप्रेमींना मिळणार आहे.

गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम वन्यजीव आणि माणसातील नातं अधिक दृढ करणारा ठरणार आहे. गुरुवळा नेचर सफारी परिसरात जंगलाच्या मध्यभागी १० ठिकाणी मजबूत लाकडी व लोखंडी मचाणांची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक मचानावर ३ ते ४ जण एकत्र बसून जंगल निरीक्षण करू शकतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काय असेल खास?

रात्रभर थांबून प्रत्यक्षदर्शी पद्धतीने आणि ट्रॅप कॅमेऱ्यांच्या साहाय्याने होणाऱ्या प्राणीगणनेत निसर्गप्रेमी थेट सहभागी होणार आहेत. वाघ, बिबट्या, अस्वल, चितळ, चौशिंगा, नीलगाय, कोल्हा, रानडुक्कर यांचं नैसर्गिक दर्शन आणि विविध दुर्मिळ पक्ष्यांचं निरीक्षण — हे सर्व एका रात्रीत, एका जंगलात!

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिस्त महत्त्वाची!

या अनुभवासाठी प्रती व्यक्ती शुल्क ₹1000 ठेवण्यात आले आहे. भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागणार असून, मांसाहारी, उग्र वास असलेले खाद्यपदार्थ जंगलात नेण्यास सक्त मनाई आहे. कारण हे जंगल आहे — इथे आपण पाहुणे आहोत.

गुरुवडा नेचर सफारीतील पाणवठ्यांची स्वच्छता, पाणीपुरवठा व मचाण उभारणी यासह सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ही रात्र निसर्गाच्या सान्निध्यात, शांततेत आणि थोड्याशा धडकीसह घालवायची असेल, तर खालील क्रमांकावर नाव नोंदवा:

अतुल – 8275840208

लंकेश – 8308536649

या संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन वनसंरक्षक (प्रा.) रमेश कुमार, उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद पेंदाम यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात आहे. गुरुवळा व हिरापूर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचा मोलाचा सहभाग असून, विजय जनबंधू, वनपाल, वनरक्षक, गाईड्स आणि वनमजूरही सज्ज आहेत.

Comments are closed.