मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
‘कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच’ – मुख्यमंत्री
मुंबई डेस्क, दि. १७ जानेवारी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात केला आहे.
मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, ‘महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा..!
कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन!’
Comments are closed.