“हत्ती आले होते भेटायला… पण अधिकारी गाढ झोपेत! — जंगलाच्या पायावर प्रकल्पांची कुऱ्हाड, गडचिरोलीत हत्तींचा ‘शहरभेट आंदोलन'”
शेकडो वर्षांची अधिवासी पार्श्वभूमी घेऊन आलेल्या टस्कर हत्तींचं शहरात धाडसी प्रवेश; विस्थापनाविरोधी 'शिष्टमंडळ' प्रशासनाच्या दुर्लक्षिततेमुळे पुन्हा जंगलात परतलं!..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर गडचिरोली २५ मे : गेल्या काही वर्षांत ओरिसा आणि छत्तीसगडच्या सीमाभागातून गडचिरोलीच्या जंगलात स्थायिक झालेल्या हत्तींसाठी आता विस्थापनाचं संकट घोंघावत आहे. लोहखाणी, महामार्ग, वीज प्रकल्प आणि खाजगी हस्तक्षेपामुळे जंगलातल्या अधिवासावर गदा येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन टस्कर हत्ती, थेट शहरात दाखल होऊन सीसीएफ आणि डिएफओंना भेटण्यासाठी आल्याची चर्चाच सध्या शहरात रंगली आहे!
शनिवार, २५ मेच्या रात्री ३ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरातील रेड्डी गोडाऊन एचपी पेट्रोल – पंप कॅनरा बँक- लांजेडा-इंदिरानगर मार्गावरून हत्ती शहरात आले. सालईटोळा जंगलातून आलेले हे दोन हत्ती सीसीएफ कार्यालयाकडे निघाले, मात्र वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित आणि डिएफओ गाढ झोपेत असल्यामुळे त्यांनी गुरवळा-विहिरगावच्या जंगलाचा मार्ग धरला.
हे हत्ती कुठल्याही राजकीय पक्षाचं निवेदन घेऊन आले नव्हते, पण त्यांची उपस्थिती एक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्न निर्माण करून गेली – “जंगलं आमची आहेत, आमचं विस्थापन नको!”
स्थानिक राजकारणात हत्तींचा संदर्भही उगम पावला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्याकडे वारंवार हत्तींच्या बंदोबस्ताची मागणी करणाऱ्यांना – “हेच हत्ती तुमच्या विस्थापनाच्या धोरणांचा परिणाम आहे” हे सांगायचा हा एक ‘निशब्द निषेध’ होता का, असा प्रश्नही विचारला जातोय.
वन्यजीवांचे जंगलातून शहरात येणे हे फक्त अपघाती घटना नसतात. ती प्रकृतीची प्रतिक्रिया असते – माणसांच्या अतिरेकाविरुद्धचा मौन आंदोल.आज ते हत्ती बोलले नाहीत, पण प्रशासनाच्या झोपेवर मोठा सवाल टाकून गेले.
Comments are closed.