अमरावती जिल्ह्यातील भानखेडा क्षेत्रातील मृत कोंबड्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’
अमरावती, दि. १९ फेब्रुवारी: अमरावती जिल्ह्यातील भानखेडा येथील वन क्षेत्रात आढळलेल्या मृत कोंबड्याचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या क्षेत्रात एकही फार्म नाही तरीही दक्षता म्हणून फार्मला आवश्यक सूचना देत नियमित तपासण्या होत आहेत. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे यांनी आज स्पष्ट केले.
भानखेडा येथील वन क्षेत्रात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मृत 50 कोंबड्या आणून टाकल्या होत्या. वनविभागाने पंचनामे करून या कोंबड्या खोल खड्ड्यात पुरल्या व तपासणीसाठी त्यांचे नमुने पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या टीमने जाऊन परिसराची पाहणी केली व हे क्षेत्र 10 किमीपर्यंत इन्फेक्शन झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
भानखेडा शिवाराच्या क्षेत्रात एकही फार्म नाही. तरीदेखील सर्व कुक्कुटपालकांना फार्म व परिसराची जैवसुरक्षा राखली जाईल, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पथकांकडून फार्मच्या तपासण्या होत आहेत. विविध फार्मवरील पक्ष्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Comments are closed.