दुसऱ्या T20 च्या अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात. सिरीजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. ६ डिसेंबर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा (India vs Australia) 6 विकेटने दणदणीत विजय झाला. याचसोबत भारताने तीन टी-20 सीरिजची मालिका एक मॅच शिल्लक असतानाच खिशात टाकली. वनडे सीरिजमध्ये झालेल्या पराभवाचा बदला विराटच्या टीमने टी-20 सीरिजमध्ये घेतला. दुसऱ्या टी-20 मध्ये भारताने विजयासोबतच नवा विक्रम केला आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 2 चेंडूआधी पूर्ण केलं. टीम इंडियाकडून शिखर धवनने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 22 चेंडूत नाबाद 42 धावांची निर्णायक खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीनेही 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्स, अँड्रयू टाय, मिचेल स्वीपसन आणि अॅडम झॅम्पा या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
विजयी आव्हानाचं सुरुवात करायला आलेल्या टीम इंडियाची आश्वासक सुरुवात झाली. शिखर धवन आणि केएल राहुल या जोडीने 56 धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर केएल राहुल बाद झाला. केएलने 22 चेंडूत 2 फोर आणि 1 सिक्ससह 30 धावांची खेळी केली. यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. धवन-कोहली जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 38 धावा जोडल्या. यादरम्यान गब्बर शिखरने आपले अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकानंतर शिखर धवन आऊट झाला. धवनने 36 चेंडूत 4 फोर आणि 2 सिक्ससह तडाखेदार 52 धावा केल्या.
धवननंतर संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. संजूला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. संजू 15 धावांवर माघारी परतला. संजूनंतर हार्दिक मैदानात आला. संजू बाद झाल्यानंतर काही ओव्हरनंतर कर्णधार विराटही निर्णायक क्षणी बाद झाला. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला.
विराटनंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. या जोडीने पाचव्या विकेटसाठी विजयी भागीदारी केली. हार्दिक आणि श्रेयसने पाचव्या विकेटसाठी नाबाद 46 धावांची भागीदारी केली. हार्दिक पांड्याने 42 श्रेयस अय्यरने नाबाद 12 धावा केल्या.
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. ऑस्ट्र्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक धावा केल्या. वेडने 32 चेंडूत 10 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 58 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने 46 धावा केल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि मोईसेस हेनरिकेसने छोटेखानी पण महत्वाची खेळी केली. मॅक्सवेल आणि हेनरिकेसने प्रत्येकी 22 आणि 26 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून थंगारासू नटराजनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर शार्दूल ठाकूर आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
Comments are closed.